शिवसेना आमदाराचा शिंदे गटावर निशाणा; म्हणाले, “उद्धव ठाकरेंसमोर मुख्यमंत्रीपदाची खुर्ची म्हणजे…”

मुंबई | Ambadas Danve On Shinde Group – एकनाथ शिंदेंनी शिवसेनेसोबत बंडखोरी करून 50 आमदारांसह भाजपसोबत हातमिळवणी केली. त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली भाजपच्या पाठिंब्यावर राज्यात नवं सरकार स्थापन झालं. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेड सोबत युती केली आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. तसंच आज राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह असताना नेतेमंडळींनी याचं निमित्त साधून टोलेबाजी केली आहे. शिवसेना आमदार आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यांच्या घरी बाप्पांची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर माध्यमांशी बोलताना शिंदे गटावर निशाणा साधला.

यावेळी अंबादास दानवे म्हणाले, “न्यायालयाच्या निकालाविषयी मी बोलणं संयुक्तिक राहणार नाही. काल-परवा एक नेते त्यावर बोलले आहेत. पण नक्कीच आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे. उद्धव ठाकरेंसारखं एक सालस आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारं नेतृत्व राज्याला लाभलं होतं. काही लोकांच्या मनात दुर्बुद्धी आल्यामुळे बाजूला सारलं गेलंय”.

उद्धव ठाकरेंसमोर मुख्यमंत्रीपदाची खुर्ची म्हणजे छोटी खुर्ची आहे. उद्धव ठाकरेंचं नेतृत्व फक्त महाराष्ट्र नाही तर तर देशाच्या वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करणारं नेतृत्व आहे. त्यामुळे येत्या काळात त्यांच्याच नेतृत्वाखाली पुन्हा एकदा महाराष्ट्रात आणि देशातही हिंदुत्वाचा झंजावात येऊ दे अशी प्रार्थना मी गणरायाला केली आहे”, असंही दानवे म्हणाले.

Sumitra nalawade: