मुंबई | Ambadas Danve’s Criticism Of Amit Shah’s Visit To Mumbai – सध्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर आहेत. नुकतंच त्यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. मुंबई महानगरपालिकेच्या अगामी निवडणुकीसंदर्भात हा दौरा असल्याचं सांगण्यात येत आहे. तसंच अमित शाह यांच्या या मुंबई दौऱ्यावर शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी टीका केली आहे. “अमित शाह यांनी मुंबईवर बेगडी प्रेम दाखवायचं काम केलं आहे. मुंबईचं महत्त्व कमी करून अहमदाबादला महत्व देण्याचं काम भाजपकडून केलं जात आहे”, अशी टीका दानवेंनी केली आहे.
मुंबईतील अनेक कार्यालये दिल्लीला हलवली असती तर समजू शकलो असतो, मात्र ती अहमदाबादला हलवण्यात आली. मुंबई- दिल्ली बुलेट ट्रेन सुरू न करता दिल्ली-अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरू केली. याचा अर्थ मराठी माणसांवरचं प्रेम आणि मुंबईचं महत्त्व कमी करून अहमदाबादला ते देण्याचं काम सुरू आहे. भाजपच्या ताब्यात अख्खा देश असताना त्यांना मुंबई महानगरपालिका कशासाठी हवी आहे? असा सवालही अंबादास दानवेंनी उपस्थित केला आहे.
पुढे ते म्हणाले, केवळ बैठका घेऊन काहीच होत नसल्याचं कळाल्यानंतर भाजपने शिवसेनेत फूट पाडून 40 आमदारांना आपल्याकडे वळवलं. पुन्हा ते मनसेच्या मागेसुद्धा लागले आहेत. त्यामुळे भाजपची ताकद अपुरी पडत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. मात्र, महाराष्ट्राची नवी जनता शिवसेनेसोबत राहणार असा विश्वास दानवेंनी व्यक्त केला आहे.