नवी दिल्ली | Supriya Sule – आज (9 डिसेंबर) महाविकास आघाडीच्या खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली. या भेटीमध्ये सध्या सुरू असलेला महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची वादग्रस्त वक्तव्ये, राज्यपाल कोश्यारींकडून छत्रपती शिवाजी महाराजांबाबत करण्यात आलेले विधान याबाबत तक्रार करण्यात आली. तसंच या भेटीनंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाबाबत अमित शाह नक्कीम मार्ग काढतील असा विश्वास सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) व्यक्त केला आहे. त्या दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.
यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, “आम्ही या सर्व घडामोडींची माहिती अमित शाह यांना दिली आहे. तसंच त्यांनी त्याची नोंद घेतली आहे. माझा विश्वास आहे की यातून ते नक्कीच काहीतरी मार्ग काढतील. आम्हाला त्यांनी शब्द दिला आहे की गुजरातचा शपथविधी झाल्यानंतर ते काहीतरी मार्ग काढतील. त्यामुळे माझा विश्वास आहे की, याप्रकरणात लवकरात लवकर केंद्रचा हस्तक्षेप होईल.”
“आमचा विश्वास आहे की देशाचे गृहमंत्री पक्षपात करणार नाहीत. ते राज्याच्या व देशाच्या हिताचं जे असेल तसा निर्णय घेतील, अशी आमची एक त्यांच्याकडून प्रांजळ अपेक्षा आहे. त्यामुळे आता पुढील आठवड्यात काय होतं हे पाहूयात.” असंही सुळे म्हणाल्या.
View Comments (0)