“त्यांच्या काळ्या टोपीखाली सडका मेंदू…”, राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यावर अमोल मिटकरींची संतप्त प्रतिक्रिया

मुंबई | Amol Mitkari On Governor Bhagatsingh Koshyari – आपल्या सततच्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत राहणारे आणि टीकेला धनी होणारे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagatsingh Koshyari) यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करुन वादाला तोंड फोडलं आहे. ते म्हणाले, ‘शिवाजी महाराज तर जुने युगाचे हिरो, डॉ. आंबेडकरांपासून तर गडकरीपर्यंत अनेकजण नवीन युगाचे हिरो आहेत. औरंगाबादच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 62 वा दीक्षान्त समारंभ आज पार पडला, यावेळी बोलताना कोश्यारी यांनी हे विधान केलं आहे.

त्यांच्या या विधानामुळे शिवप्रेमी संघटनांकडून विरोध होताना पाहायला मिळत आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे मागच्या काही काळापासून वादग्रस्त विधानं करत आहेत. विशेषतः महापुरुषांबद्दल बोलतांना त्यांची जीभ घसरलेली आहे. आज औरंगाबाद येथे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि नितीन गडकरी यांना मराठवाडा विद्यापीठाकडून डि.लिट पदवी देण्यात आली. यावेळी त्यांनी हे वादग्रस्त विधान केलं आहे.

राज्यपाल कोश्यारी म्हणाले, “आम्ही जेव्हा शाळेत जायचो, तेव्हा आम्हाला आमचे शिक्षक विचारायचे, तुमचे आवडते नेते कोण आहेत? मग ज्यांना सुभाषचंद्र बोस चांगले वाटायचे, ज्यांना नेहरू चांगले वाटायचे, ज्यांना गांधीजी चांगले वाटायचे ते त्या त्या व्यक्तींचं नाव घ्यायचे. मला असं वाटतं की जर कुणी तुम्हाला विचारलं की तुमचे आवडते हिरो किंवा आदर्श कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील. महाराष्ट्र नवरत्नांची खाण आहे. शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत. मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉक्टर आंबेडकरांपासून डॉ. नितीन गडकरींपर्यंत सगळे तुम्हाला इथेच मिळतील”

दरम्यान, राज्यपालांच्या या वादग्रस्त वक्तव्यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. “महाराष्ट्राचे राज्यपाल सतत वादग्रस्त विधान करण्यात पटाईत आहेत. त्यांनी मागील काळात अनेक महापुरूषांबद्दल वादग्रस्त विधानं केली आहेत. मात्र, यावर त्यांनी अजूनही माफी मागितली नाही”, असं अमोल मिटकरी म्हणाले.

पुढे ते म्हणाले, राज्यपालांच्या काळ्या टोपीखाली सडका मेंदू आहे. आज पुन्हा त्यांनी आपली जीभ उचलली आणि टाळ्याला लावली. मराठवाडा विद्यापीठात चालू असलेल्या समारंभात शरद पवार आणि नितीन गडकरी यांना मानाची डी लिट पदवी प्रदान करण्यात आली. तेव्हा हुरळून जाऊन एखादा माणूस जसं गडकरी आणि पवारांनी आपल्या पाठीवर कौतुकाची थाप द्यावी यासाठी बेताल वक्तव्य करावं तसं त्यांनी केलं आहे. ते शिवाजी महाराजांबद्दल एकेरी बोलले. छत्रपती शिवाजी महाराज असं बोलण्याचं त्यांनी औदार्य दाखवलं नाही. कोई गांधी को मानता हे, कोई नेहरू को मानता है, कोई सुभाषचंद्र बोस को मानता है असं ते एकेरी बोलले”, असंही अमोर मिटकरी यांनी म्हटलं आहे.

Sumitra nalawade: