मुंबई | Amol Mitkari On Mohit Kamboj – भाजप नेते मोहित कंबोज यांनी एक सूचक ट्विट केलं होतं. अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यानंतर राष्ट्रवादीचा आणखी एक नेता तुरूंगात जाणार असल्याचं ट्विट कंबोज यांनी केलं होतं. याच संदर्भात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी कंबोज यांच्यावर निशाणा साधला आहे. मोहित कंबोज हा कोणाच्या चड्डीचा नाडा आहे, हे सगळ्यांना माहीत असल्याचं मिटकरींनी म्हटलं आहे.
आजपासून (17 ऑगस्ट) विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची सुरूवात झाली आहे. त्याआधीच मोहित कंबोज यांनी केलेल्या सूचक ट्विटची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यावेळी अमोल मिटकरी यांनी कंबोज यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मोहित कंबोज हा भाजपचा भोंगा आहे. हा भोंगा जनतेच्या प्रश्नावर, स्त्री अत्याचारावर, जीएसटी आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कधीही वाजत नाही, अशी टीका मिटकरींनी केली आहे. मोहित कंबोज हा ‘लष्कर-ए-देवेंद्र’ मधील तिसऱ्या फळीतील नेता असल्याचंही मिटकरींनी म्हटलं आहे.
दरम्यान, मोहित कंबोज यांना बोलण्याचा अधिकार आहे. मात्र, त्यांना माहिती कोण देतंय याची चौकशी करणं गरजेचं आहे. ईडी कार्यालयात कंबोज बसत असतील त्यांची चौकशी करावी अशी मागणी मिटकरी यांनी केली आहे. मोहित कंबोज यांना ईडीसह इतर तपास यंत्रणांच्या कारवाईची माहिती कशी मिळते याची चौकशी करावी अशी मागणी देखील मिटकरी यांनी केली आहे.