मुंबई – Amol Mitkari on BJP | राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. त्यासाठी 30 जून अर्थात गुरुवारी विधानसभेचं विशेष अधिवेशन देखील बोलावलं आहे. त्यामुळे राज्यात पुढच्या 48 तासांत काय होणार? याविषयी राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. तसंच राज्यपालांनी दिलेले आदेश घटनाबाह्य असल्याचा दावा करणारी याचिका देखील राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सूचक शब्दांत केलेल्या ट्वीटमुळे चर्चांना उधाण आलं आहे.
राज्यपालांनी दिलेल्या निर्देशांनंतर भाजपाकडून 48 तासांचा अल्टिमेटम राज्य सरकारला दिला जात आहे. त्यावर अमोल मिटकरींनी ट्वीटच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. अति उतावीळ वऱ्हाडाला पाहुणचार म्हणून दगड गोटे मिळाल्याची घटना महाराष्ट्रात ताजी आहे. सरकार स्थापनेचा उतावीळपणा करत ’48’ तासाचा अल्टीमेटम देणाऱ्या उतावीळ नवऱ्यांनो…अजून बरच काही बाकी आहे, असं अमोल मिटकरी आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहे.
“महामहिम राज्यपाल महोदय दडपशाही खाली आहेत का? हे सुद्धा तपासले पाहिजे. इकडे सोळा आमदारांचा निर्णय अजूनपर्यंत होत नाही आणि बहुमत चाचणीचा आदेश एका रात्रीत निघतो, हे कसे? नक्कीच काहीतरी गडबड आहे”, असं देखील मिटकरींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.