मुंबई | Amruta Fadnavis Talk About Uddhav Thackeray In Bus Bai Bus Show – झी मराठी वाहिनीवर नुकताच सुरू झालेला ‘बस बाई बस’ हा कार्यक्रम सध्या चांगलाच चर्चेत आहे. या कार्यक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवलेल्या महिला सहभागी होणार आहेत. तसंच या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे करत आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली होती. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या ‘बस बाई बस’च्या पुढील भागामध्ये दिसणार आहेत.
‘बस बाई बस’मधील अमृता यांचे काही प्रोमो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. आता अमृता यांचा या कार्यक्रमामधील नवीन प्रोमो सोशल मीडियाद्वारे प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘कशी नशिबानं थट्टा आज मांडली’ हे गाणं ऐकल्यावर कोणाचा चेहरा समोर येतो? असा प्रश्न सुत्रसंचालक सुबोध भावे अमृता यांना विचारतो. यावर त्या उत्तर देतात की, “उद्धवजी ठाकरे यांचा खूप मान आणि सन्मान. पण हे गाणं ऐकल्याबरोबर मला त्यांचाच चेहरा आठवला.”
दरम्यान, अमृता यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. तसंच हा व्हिडीओ पाहून काहींनी त्यांना ट्रोल देखील केलं आहे. त्याचबरोबर अमृता या कार्यक्रमामध्ये राजकीय परिस्थितीबाबत अधिक बोलताना दिसणार असल्याचं चिन्ह दिसत आहे.