जपानमधील रोजगार संधींबाबत जाणून घेण्याची शहरातील विद्यार्थ्यांना संधी

पिंपरी : पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयात दोन दिवस ‘नो जपान’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १४ आणि १५ ऑक्टोबर रोजी सकाळी नऊला उद्‌घाटन होईल. हा कार्यक्रम ट्रस्ट, इंडो-जपान बिझनेस कौन्सिल, जपान एक्स्टर्नल ट्रेड ऑर्गनायझेशन यांच्या विद्यमाने शिक्षण व उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींसाठी आयोजिला आहे.

कार्यक्रमाला जपानचे मुंबईतील वाणिज्य दूतावास प्रमुख सल्लागार डॉ. फुकाहोरी यासुकाता, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे, पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई आदी उपस्थित राहणार आहेत. जपानमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील विद्यार्थ्यांसाठी तसेच कामगारांसाठी शिक्षण, संशोधन, रोजगार, उद्योग यासाठी हा कार्यक्रम उपयुक्त ठरणार आहे. विद्यार्थ्यांना विविध जपानी विद्यापीठांमध्ये व उद्योगांमध्ये उपलब्ध असणाऱ्या शिक्षण, शिष्यवृत्ती, संशोधन आणि करिअरच्या संधी या विषयी मार्गदर्शन या वेळी करण्यात येणार आहे. कार्यक्रमात बारावी पास झालेल्या कोणत्याही शाखेचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात.

Sumitra nalawade: