एडिटर्स चॉईस | अनिरुद्ध बडवे |
देशातील आणि राज्यातील सर्वांत जुना पक्ष असलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा चेहरा आज अत्यंत केविलवाण्या पद्धतीने हरवत चाललाय. राष्ट्रवादीच्या अवलंबित्वापासून ते कालच्या विश्वासदर्शक ठरावाला अशोक चव्हाण यांच्यासह दहा आमदारांनी दांडी मारून थेट पक्षादेश (व्हीप) झुगारेपर्यंत या पक्षात काय चालले आहे, याचा कोणालाच पायपोस राहिलेला नाही. काल सोनिया गांधी यांच्या चौकशीच्या विरोधात लुटीपुटीचे आंदोलन करण्याच्या पलीकडे पक्षाने गेल्या काही महिन्यांत काहीही कामगिरी केलेली नाही. गांधी यांच्या कारवाईच्या विरोधातील आंदोलन हे केवळ पक्षनिष्ठा दाखवण्यासाठी होते, त्यात सर्वसामान्यांच्या प्रश्नांचा संबंध नव्हता. देशाची जडणघडण आणि प्रगल्भ विरोधकांच्या अस्तित्वाची गरज लक्षात घेता काँग्रेसचे हे विरत जाणे देशालाही परवडणारे नाही…
महाकाय देशाच्या स्वातंत्र्यपूर्व इतिहासापासून ते स्वातंत्र्योत्तर इतिहासाच्या अनेक मोठ्या कालखंडापर्यंत जो पक्ष या संपूर्ण उभारणीमध्ये सहभागी होता, तो केवळ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा होता. शेतशिवारातील कोरडवाहू शेतकऱ्यांच्या समस्यांपासून ते राष्ट्रीय नाणेनिधीच्या धोरणांपर्यंत काँग्रेसच्या योगदानाचे महत्त्व कोणीही नाकारू शकत नाही. अनेक स्थित्यंतरांनंतर जनता पक्ष आणि त्यानंतरच्या भारतीय जनता पक्षाचे खासदार तीन शतकी संख्या ओलांडून देशाचे प्रतिनिधित्व करू लागले. एक-एक राज्य देखील त्यांनी काबीज केली. त्याच वेळेला प्रादेशिक पक्षांचाही विस्तार वाढत गेला, परंतु मूळ इंदिरा काँग्रेस कुठे आहे, हा प्रश्न अत्यंत भयावह आणि देशाच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातूनही चिंता निर्माण करणारा आहे.
फरफट सुरूच
आज महाराष्ट्रामध्ये गेल्या महिन्याभरापासून चाललेल्या सत्तांतरांच्या घटना, घडामोडींमध्ये काँग्रेसचे नेमके स्थान कोठे आहे हेदेखील अत्यंत विदारक पद्धतीने समोर आले आहे. एक आमदार असलेल्या प्रहार संघटनेच्या बच्चूसह नगण्य असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठिंब्यापर्यंत सगळी चर्चा होत गेली , परंतु काँग्रेसच्या सहभागीत्वाची चर्चा आणि त्यांचा परामर्ष घेण्याची आवश्यकतादेखील कोणाला वाटली नाही. म्हणजे किती वाईट पद्धतीने हा पक्ष फरफटत चालला आहे, याची प्रचिती येते.
हंडोरेंच्या पडण्याचे देणेघेणेच नाही
चंद्रकांत हंडोरे सारखा मागासवर्गीय समाजाचा माणूस या विधान परिषदेमध्ये पाडला जातो, त्याचेही सोयरसुतक आज सोनिया गांधी पासून ते ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्षापर्यंत कोणालाही नाही. येऊनजाऊन काही मागासवर्गीय संघटनांनी याचा निषेध आणि आंदोलने केली, पण त्याची दखलदेखील पक्षाने घेतलेली नाही. हाच आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचा किंवा भाजपचा पडला असता तर प्रचंड गहजब झाला असता.
हा गहजब अगदी राष्ट्रीय राजकारणाचे पट मांडत असताना भविष्यातील व्यूहरचना ठरविण्यापर्यंत गेला असता, परंतु एवढ्या मोठ्या पक्षाचा एक आमदार आपल्याच आमदारांकडून पाडला जातोय याचे सोयरसुतक कोणालाही नाही ? ही अत्यंत वेदनादायी गोष्ट आहे. त्याच पक्षात ही परिस्थिती एखाद्या प्रस्थापित घराण्याच्या वाट्याला आली असती तर त्यानेदेखील पक्षात गहजब माजवला असता; परंतु चंद्रकांत हंडोरे यांची कुणाला काय पडली आहे. मागासवर्गीय चेहरे सोयीप्रमाणे वापरायचे आणि पुन्हा ते त्या त्या ठिकाणी ठेवून द्यायचे. हीदेखील एक प्रवृत्ती पक्षांमध्ये वाढत चालली होती, त्याचा आता कळस झाला असेच म्हणावे लागेल.
शीर्षस्थ नेत्यांनीच मोडले व्हीप
अशोक चव्हाण यांच्यासह दहा आमदारांनी थेट विश्वासदर्शक ठरावालाच अनुपस्थित राहाणे पसंत केले . पक्षाचा व्हीप डावलला. राज्यातील काँग्रेसचा चेहरा म्हणून, मुख्यमंत्री म्हणून एकेकाळी ज्याला प्रोजेक्ट केले त्या नेतृत्वाने थेट व्हीप डावलण्याचा निर्णय घ्यावा आणि त्यावर कुठलीही कारवाई होऊ नये हा एक अजबगजब प्रकार आहे. म्हणजे या सर्व प्रकाराला काँग्रेसचे एकप्रकारे अनुमोदन होते असे म्हणायचे का? असे असेल तर शिंदे मुख्यमंत्री होण्यामध्ये काँग्रेसचाही तितकाच महत्त्वाचा सहभाग आहे, असे मानावे लागेल . नेमकं कुठे चाललं आहे ? पक्ष कोणाकरिता काय करतोय ? विचारधारेचे तर सोडूनच द्या… परंतु राजकीय अस्तित्वाबाबत तरी योग्य निर्णय का घेतले जात नाहीत? याचे शल्य सामान्य काँग्रेस कार्यकर्त्याच्या मनामध्ये आहे .
जनतेचा पक्ष पुढाऱ्यांचा झाला
एकेकाळी जनतेच्या सामान्य समस्या घेऊन रस्त्यावर लढणारा पक्ष म्हणून या पक्षाला जनतेने डोक्यावर घेतले . इंदिराजींचे नेतृत्व आभाळाएवढे वाटायचे आणि त्या आभाळवृक्षाखाली देशातील कार्यकर्त्यांची एक पिढी पोसली गेली. विचाराने भारावलेल्या या प्रवासामध्ये तरी स्वातंत्र्याचा विचार, कधी शेतकऱ्यांचा विचार, कधी अल्पसंख्याकांचा विचार, तर कधी महिलांचा विचार, महिला नेतृत्वाचे उदात्तीकरण… या सगळ्या विचारधारेतून काँग्रेस पक्ष अत्यंत परिपक्व आणि प्रकल्भ होत गेला.
हळूहळू ही विचारसरणी सुटत चालली, तसे प्रादेशिक पक्षदेखील बलवान होत चालले आणि त्यावेळेला संघीय राजकारणातून भारतीय जनता पक्षासारख्या पक्षाने सातत्याने कात टाकत विचारसरणीला वळणे घेत व्यापक जनसंपर्क आणि जनभावना जोपासत सर्वांच्या मनावर आरूढ होण्याचा प्रयत्न केला.
एकेकाळी ब्राह्मण्यवादाचा संकुचितपणा लागलेला भाजप आज अल्पसंख्याक सेलपासून ते उद्योग आघाडी आणि आध्यात्मिक आघाडीपर्यंत सर्वांना कवेत घेत गेला, त्यावेळी काँग्रेसला हे नेतृत्व आणि दिशा देण्यासाठी पक्षातील नेते कुठेतरी कमी पडले हे मान्य करावे लागेल. जनतेच्या पक्षाचा संकोच झाला आणि प्रस्थापित घराणे आणि काही नेते पुढार्यांच्या मर्जीने चालणारा पक्ष म्हणून या पक्षाला मर्यादा पडल्या.
ज्याप्रमाणे महाराष्ट्रातील प्रस्थापित घराणे, गादी सांभाळत राष्ट्रवादीने प्रसंगी जातीचा आधार घेत पक्षविस्ताराचा कार्यक्रम राबवला, तोदेखील काँग्रेस पक्षाला आणि त्यांच्या प्रादेशिक नेतृत्वाला कधी राबवता आला नाही. हेदेखील वास्तव आहे.
त्यामुळे गरज पडेल तसे सुशीलकुमार शिंदे वापरायचे, अशोक चव्हाण वापरायचे, विलासराव वापरायचे… आमदारांच्या संख्याबळानुसार निर्णय घ्यायचे हे कार्यक्रम राबत गेले, परंतु सामान्य माणूस आपल्यापासून तुटत चालला आहे याचे भान कधीच ठेवले गेले नाही.
दिशाहीनतेकडून अस्तित्वहीनतेकडे?
उद्याच्या येणाऱ्या नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस हा स्थानिक राष्ट्रवादी आणि आघाड्यांच्या सोबत फरफटत जाणार हे स्पष्टच आहे. कुठेही काँग्रेसचे चिन्ह पंजा रुजवण्यासाठी काही निर्णय घेण्यात येणार आहे याची सुतराम शक्यता नाही, तर दुसरीकडे राज्याच्या राजकारणातदेखील हा पक्ष आता दिशाहीन झालाच आहे, परंतु तो अदृश्य होणार नाही ना, याची भीती आहे. एक समर्थ विरोधी पक्ष म्हणूनदेखील काँग्रेसला आता उभे राहता येत नाही हे या पक्षाचे सर्वांत मोठे दुर्दैव आहे. प्रमुख विरोधकाची जागासुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस घेत आहे. ते काँग्रेस घेऊ शकत नाही. पक्षामध्ये पटोले – चव्हाण , कदम – तांबे, विखे – चव्हाण हे असले वाददेखील उरल्यासुरल्या काँग्रेसच्या अस्तित्वाची पाळेमुळे खणून बाजूला फेकून देण्याकरिता पुरेसे आहेत. एकूणच या सगळ्या शोकांतिकेला सोनिया गांधी, राहुल गांधींपासून ते नाना पटोलेंपर्यंत सर्वच नेतृत्व जबाबदार आहेत.
ऐतिहासिक पक्ष संपविणारी पिढी
या पिढीच्या काँग्रेसच्या या सर्व नेतेमंडळींनी एवढा मोठा इतिहास असलेला राष्ट्रीय पक्ष संपविण्याचे पाप चालविले आहे. त्यामुळे हा पक्ष जर संपला, अस्तित्वहीन झाला तर याचे पापदेखील याच पिढीला आणि यांच्या घराण्यांना असेल. किशन सिंग बेदी एकदा म्हणाले होते, या पक्षाला अरबी समुद्रात बुडवण्याची वेळ आली आहे. कदाचित हे विसर्जन त्या पक्षाचा झेंडा हाती घेणाऱ्या या पिढीच्या हस्तेच होते की काय, अशी भीती आहे.