पुणे | Anand Dave On Sharad Pawar – काल (शनिवार) डॉ. श्रीमंत कोकाटे लिखित ‘शिवचरित्र आणि विचार प्रवाह’ ग्रंथाचे प्रकाशन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी शिवाजी महाराजांच्या इतिहास लिखाणावर बोलताना पवार यांनी इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे यांच्या लिखाणावर टीका केली होती. त्यांच्या टिकेवरून वादाचं वातावरण निर्माण झालं आहे. ब्राह्मण महासंघाने पवारांवर निशाना साधला आहे.
काय म्हटले होते शरद पवार?
शरद पवार शनिवारी पुण्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आधारित डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी लिहिलेल्या ‘शिवचरित्र आणि विचार प्रवाह’ ग्रंथाचे प्रकाशन करण्यासाठी आले होते. त्यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘बाबासाहेब पुरंदरे यांचा शिव छत्रपतींवरील लिखाण आणि भाषणांएवढा अन्याय महाराजांवर दुसरा कोणीही केला नसेल. पुरंदरे यांनी आपल्याला वाटेल त्या व्यक्तीला इतिहासात जास्तीचे महत्व दिले. मात्र खरा इतिहास नवीन पिढीला कळायला हवा.
शरद पवार यांच्या या वक्तव्यावर ब्राह्मण महासंघाकडून निषेध करण्यात आला आहे. शरद पवार यांनी यापूर्वी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं कौतुक केलं होतं. मात्र आता ते पुरंदरेंच्या विरोधात बोलत आहेत. नेमके खरे पवार कोणते आहेत. कौतुक करणारे की विरोधात बोलणारे. असा सवाल ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी शरद पवारांना विचाराला आहे. त्यावेळी बोलताना दवे यांनी सांगितलं की, 1984 साली शरद पवार यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी उभारलेल्या शिवसृष्टीचे वर्णन केले होते. त्यावेळी पवार यांचा लिखित अभिप्राय असल्याचं देखील दवे यांनी सांगितलं आहे.