मुंबई | Anand Mahindra – सोशल मीडियावर दररोज काहीना काही कला सादर करणारे व्हिडीओ व्हायरल होत असतात. या व्हिडीओला नेटकरी देखील मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत असतात. तर असाच एक व्हिडीओ उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एका कार्यक्रमात जंगलाचं वातावरण निर्माण करण्यात आलं आहे. तसंच या जंगलात प्राणी आणि पक्षीही दिसत आहेत. मात्र, हे प्राणी किंवा पक्षी नसून काही कलाकारांनी ही कलाकृती सादर केलेली आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ एका ‘टॅलेंट हंट शो’मधील आहे. या व्हिडीओमध्ये एक घुबड स्टेजवर बसलेलं दिसत आहे. मात्र, काही सेकंदातच हे घुबड नसून हे एका कलाकरानं साकारलेलं रूप आहे, हे स्पष्ट होतं. तसंच पुढे अनेक वेगवेगळे प्राणी ते कलाकार साकारतात. त्यांची ही कलाकृती पाहून स्टेजवरील मान्यवर देखील चकीत होतात.
दरम्यान, आनंद महिंद्रा हे नेहमी ट्विटरवर काहीना काही प्रेरणादायी व्हिडीओ नेटकऱ्यांसोबत शेअर करत असतात. आता देखील त्यांनी हा उत्तम कलाकृती साकारलेला व्हिडीओ शेअर केला असून याला नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे.