ठाणे : (Anand Paranjpe On Shrikant Shinde) शिंदे गट आणि भाजप यांच्यात सर्व काही आलबेल नसल्याचे पुन्हा एकदा आधोरेखीत झालं आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांनी मदत न करण्याचा जणू काही ‘पन’च केला आहे. आगामी कल्याण लोकसभा निवडणुकीसाठी भाजप कार्यकर्ते म्हणतील तोच उमेदवार निवडण्यात यावा. तसेच शिंदे गटाला कोणतेही सहकार्य न करण्याच भाजपने ठरवले आहे. त्यांच्या कार्यक्रमांवर बहिष्कार टाकण्याचा निर्धार कल्याण पूर्वेतील भाजपच्या विशेष मंथन बैठकीत करण्यात आला.
काही शुल्लक कारणांसाठी युतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचे स्वार्थी राजकारण डोंबिवलीतल्या काही नेत्यांकडून सुरू आहे. मला व्यक्तीशः कोणत्याही पदाची लालसा नाही. युतीमध्ये जर विघ्न निर्माण होत असेल तर, माझी पदाचा राजीनामा देण्याची तयारी आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलं होतं. आता या वादात राष्ट्रवादीने उडी घेतली आहे. कल्याण लोकसभेचे माजी खासदार आणि राष्ट्रवादी नेते आनंद परांजपे यांनी खा.डॉ.शिंदेवर टीका केली आहे.
यावर बोलताना परांजपे म्हणाले, काल खासदार शिंदे यांनी जे वक्तव्य केले ते मी गांभीर्याने घेत नाही. कारण, ती वक्तव्य अभ्यासपूर्णही नाहीत. राक्षसी महत्वकांशी पोटी, सत्तेच्या लालसेपोटी आणि गद्दारीमुळे जे सरकार महाराष्ट्रात एक वर्षांपूर्वी आलं ते राजीनामा देतील का? त्यांच्याकडे नैतिकता आहे का? त्यांच्याकडे निष्ठा आहे का? त्यांच्याकडे समर्पण आहे का? या प्रश्नांच उत्तर नाही असं आहे. त्यामुळे ते राजीनामा अजिबात देणार नाहीत. त्यांना बोलायचं एक असतं आणि करायचं एक असतं, अशी टीका परांजपे यांनी केली आहे.