चीन भारतीय विमानशास्त्र हा वैज्ञानिक क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून एक हास्यास्पद पण विवाद्य विषय झाला आहे. विशेषत: २०१५ सालच्या जानेवारी महिन्यात मुंबईला भरलेल्या इंडियन सायन्स कॉग्रेसच्या अधिवेशनात या विषयावर एक प्रबंध वाचण्यात आला. यावरुन जो गदारोळ निर्माण झाला त्याचे पडसाद प्रसारमाध्यमांमध्ये पुढे कित्येक महिने उमटत होते.
अनेक प्रसारमाध्यमांनी आणि काही ज्येष्ठ शास्त्रज्ञांनी या निमित्ताने केवळ या ग्रंथावर नाही तर सगळ्या प्राचीन भारतीय विज्ञानावर भरपूर तोंडसुख घेतले. कोणा एका परदेशस्थित भारतीय शास्त्रज्ञाने असले छद्म विज्ञानाचे विषय या विज्ञानाच्या अधिवेशनात मांडायला कशी परवानगी आणि कोणी दिली, यासाठी कोर्टातही धाव घेतली होती.
या सर्वांचा मुख्य मुद्दा असा होता की या ग्रंथामध्ये विमान कसे उडते, यांचे कुठलेही सैद्धांतिक स्पष्टीकरण दिलेले नाही आणि विमान कसे उडवायचे यासंबंधीचे काही प्रपत्रक ( मॅन्युअल) सापडत नाही. तसेच विमान उडविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या इंधनाविषयीही काही माहिती उपलब्ध नाही.त्यामुळे प्राचीन काळी भारतात ‘विमान शास्त्र’ असे काही शास्त्र नव्हते. जे काही शास्त्र म्हणून सांगितले जाते, ते एक ‘काल्पनिक शास्त्र’च होते. या मुद्द्यावरची थोडी चर्चा मी २६ जून,२०२२ च्या अंकात केली आहे. आता आपण सविस्तर चर्चा करु.
आधुनिक विमानशास्त्राचा (एरोनॉटिक्स) जन्म राईट बंधुंच्या पहिल्या यशस्वी उड्डाणानंतर झाला. राईट बंधूंनी कुठल्याही विमानशास्त्राचा अभ्यास करून हे उड्डाण केले नव्हते तर त्यावेळी उपलब्ध असलेल्या फिजिक्स, मॅथेमॅटिक्स आणि केमिस्ट्री या शास्त्रांचा अभ्यास करून केले होते. या यशस्वी उड्डाणानंतर खऱ्या अर्थाने विमानशास्त्रामध्ये प्रगती झाली आणि विमानशास्त्रावर अनेक ग्रंथ निर्माण झाले. आता विमान शास्त्राने फिजिक्स, गणित आदी इतर सर्व शास्त्रांचा आणि प्रत्यक्ष अनेक प्रकारच्या उड्डाणांवर आधारित असा अभ्यास करून स्वतः चे सिद्धांत आणि नियम तयार केले आहेत.
या सिद्धांतांचे पालन करुनच नव्या विमानांची निर्मिती केली जाते. याचा अर्थ असा होतो की आताच्या विमानशास्त्रात प्रत्येक वेळी पदार्थ विज्ञानशास्त्राच्या किंवा रसायनशास्त्राच्या मुलभूत सिद्धांतांचा उल्लेख करण्याची गरज नसते. ते सिद्धांत गृहित धरूनच पुढची मांडणी केली जाते. ही पद्धत आता जर सर्वमान्य असेल तर हीच पद्धत भारद्वाज ऋषिंनी त्यांचे विमानशास्त्र लिहीताना वापरली असेल, असे आपण का म्हणू शकणार नाही? कारण, या ग्रंथाच्या सुरुवातीलाच त्यांनी एकुण सात ग्रंथांचा उल्लेख केला आहे.
त्या ग्रंथांची नांवे मी २६ जूनच्या लेखात दिली आहेत. वाचकांच्या सोयीसाठी मी पुन्हा ही नांवे सांगतो.१. नारायणकृत- विमान चंद्रिका, २. शोनककृत- व्योमयानतंत्र, ३.गर्गकृत-यंत्रकल्प, ४. वाचस्पतीकृत-यानबिंदु, ५.चाक्रायणीकृत-व्योमयानप्रदिपिका, ६.धुंडिनाथकृत- व्योमयानार्कप्रकाश आणि ७.अगस्तीकृत- आगस्त्य विमान संहिता. व्योमयान या संस्कृत शब्दाचा अर्थ, व्योम म्हणजे आकाश आणि व्योमयान म्हणजे आकाशात उडणारे, म्हणजेच विमान, हे अगदी स्पष्ट आहे. ज्याअर्थी, भारद्वाजांच्या विमान शास्त्रावरच्या ग्रंथामध्ये या ग्रंथांचा उल्लेख आहे, त्याअर्थी हे सगळे ग्रंथ त्यापूर्वीचे असले पाहिजे, हे स्पष्ट आहे.
म्हणजे, आधुनिक विमानशास्त्राचा जन्मच मुळी २०व्या शतकाच्या सुरुवातीला झाला, पण त्याच्या कितीतरी शतकेआधी भारतामध्ये केवळ विमानशास्त्राला वाहिलेले सात ग्रंथ अस्तित्वात होते. दुर्दैवाने आज या ग्रंथांपैकी एकही ग्रंथ उपलब्ध नाही. अगस्त्य संहितेचा काही थोडा भाग आणि भारद्वाजांच्या विमानशास्त्राचा थोडा भाग केवळ आपल्याला उपलब्ध आहे. या सात ग्रंथांमध्ये विमानशास्त्राविषयी काय माहिती होती, ते कळायला काही दुसरा पर्याय नाही.
पण कायद्याच्या भाषेत किंवा अगदी विज्ञानाच्या भाषेतसुद्धा ज्याला आपण ‘बेनिफिट अॉफ डाऊट’ असे म्हणतो, तो बेनिफिट अॉफ डाऊट आपण या ग्रंथांना देऊ शकणार नाही कां? म्हणजे या ग्रंथांपैकी एक/दोन ग्रंथांमध्ये विमान उड्डाणाचे सैद्धांतिक स्पष्टीकरण दिलेले असेल आणि त्याचा संदर्भ घेऊन भारद्वाज ऋषिंनी पुढे ग्रंथ लिहिला आहे, हे म्हणणे सयुक्तिक नाही कां ? केवळ विमानशास्त्राला वाहिलेला असा एकही ग्रंथ प्राचीन पाश्चात्य संस्कृतीमध्ये नाही. त्यामुळे भारतीय संस्कृतीत पूर्वी विमानविद्या होती, हा विचार पाश्चात्य विद्वानांना पचनी पडणे कठीण होते. त्याचीच ‘री’ आपल्याकडील विद्वान अजूनही ओढीत असतात.
सुमारे ४०-५० वर्षांपूर्वी या विषयावरील चर्चा सुरू झाली. काही प्राचीन भारतीय संस्कृतीचा अभिमान असणाऱ्या मंडळींनी असा दावा केला की, प्राचीन काळापासून भारतामध्ये विमानविद्या अस्तित्वात होती आणि प्राचीन राजे-रजवाडे अशी विमाने वापरत असत. याला पुरावा म्हणून या मंडळींनी श्रीरामाने वापरलेल्या पुष्पक विमानांचे उदाहरण दिले. सहाजिकच पुरोगामी, बुद्धीवादी मंडळींकडून यावर तिखट प्रतिक्रिया आली. कुठलेही पुरावे नसताना असे दावे करणे, हे हास्यास्पद आणि अवैज्ञानिक स्वरुपाचे आहे, असे ते म्हणाले.
हा वाद रंगत गेला. हिंदू धर्माभिमानी मंडळींकडे ठोस असा एकही पुरावा नव्हता. या मंडळींचा दावा आणखी हास्यास्पद करण्यासाठी बंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेतील काही शास्त्रज्ञांनी १९७४ साली एक रिसर्च पेपर प्रसिद्ध केला. त्यांनी उपलब्ध असणाऱ्या भारद्वाज ऋषिंचा तथाकथित विमानशास्त्राचा अभ्यास करून त्याचे निष्कर्ष या प्रबंधामध्ये मांडले. त्यांनी मांडलेले काही निष्कर्ष असे होते…
१. या ग्रंथातील भाषा आधुनिक संस्कृत आहे, प्राचीन संस्कृत वाटत नाही. त्यामुळे हा ग्रंथ दावा केला जातो तितका प्राचीन नाही. कदाचित तो राईट बंधूंच्या यशस्वी उड्डाणानंतर, आमच्याकडेही हे शास्त्र होते, हे दाखवण्यासाठी कोणीतरी हा हास्यास्पद प्रकार केला आहे.
२. या ग्रंथातील आकृत्यांप्रमाणे कोणी विमान बनविले तर ते विमान हवेत उंच उडणे तर दूर पण ते उड्डाण करुच शकणार नाही; कारण असे विमान हे हवेत उडण्यास सक्षम ( Aerodynamically stable) नसेल.
३. यातील विमानांमध्ये वापरण्यात येणाऱ्या धातु तयार करण्याचे पद्धतींचे वर्णन काल्पनिक वाटते. आधुनिक धातुशास्त्राप्रमाणे या पद्धती अगदी वेगळ्या आहेत. आणखी काही मुद्दे या प्रबंधामध्ये आले आहेत, पण ते फारसे महत्वाचे नाहीत. हा प्रबंध एका प्रतिष्ठित विज्ञानाच्या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला. या प्रबंधाने प्राचीन भारतीय संस्कृतीविषयी खोटा अभिमान बाळगणाऱ्या मंडळींची सपशेल हार झाली, असे मानून आधुनिक वैज्ञानिकांनी हा विषय कायमचा बंद करून टाकला. हा प्रबंध प्रसिद्ध झाल्यानंतर आजपर्यंत कुठलीही मान्यवर वैज्ञानिक प्रयोगशाळा या विषयावर पुनर्संंशोधन करण्याच्या भानगडीत पडली नाही. या कायमस्वरूपी बंद झालेल्या विषयावर २०१५ सालीच्या सायन्स अधिवेशनात पुन्हा या विषयाने डोके वर काढल्यामुळेच या कार्यक्रमात वैज्ञानिकांनी गोंधळ घातला.
पण या प्रकाराने हताश न होता काही मंडळींनी, (ज्यामध्ये अनेक इंजिनिअरिंग महाविद्यालयांतील प्राध्यापक, वनस्पती शास्त्रज्ञ आणि आयुर्वेदातील तज्ञ आहेत) स्वखर्चाने या विषयातील संशोधनकार्य चालू ठेवले आहे. आता त्यांच्या प्रयत्नांना हळूहळू यश येताना दिसत आहे. या मंडळींनी ज्याचा वर उल्लेख झाला आहे, त्या संशोधन प्रबंधावर काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
त्यापैकी एक असा आहे की, आपण भारद्वाज ऋषिंचा हा ग्रंथ किती प्राचीन आहे, याचा फारसा विचार न करता या ग्रंथातील माहितीकडे जर लक्ष केंद्रित केले तर असे दिसते की, या ग्रंथातील माहिती, ती विमानाच्या आकारासंबंधी असो किंवा ज्या आकृत्या दिल्या आहेत त्यासंबंधी असो, ही माहिती आधुनिक विमानांचे जे स्वरूप आपण नेहमी पहातो, त्यापेक्षा अगदीच विपरीत आहे.
विमानाच्या बांधणीसाठी लागणाऱ्या विविध धातुंच्या निर्मितीची पद्धत हीसुद्धा आधुनिक धातुशास्त्राशी न जुळणारी आहे. जर हा ग्रंथ कोणी का असेना, त्याने जर राईटबंधुंच्या यशस्वी उड्डाणानंतर लिहिला असेल, तर त्यामधील माहिती ही आधुनिक विमानशास्त्राशी इतकी विपरीत कशी ? वैज्ञानिकांच्या मते, जर या आकृत्यांप्रमाणे कोणी विमान बनविले तर ते उड्डाण करुच शकणार नसेल तर अशा विमानांची आकृती ग्रंथामध्ये देण्याचे धाडस कोण करेल? या मुद्यावर अजुनतरी समाधानकारक उत्तर प्रतिपक्ष देऊ शकला नाही.
(क्रमशः)