प्राचीन भारतीय पदार्थविज्ञान शास्त्र

शास्त्रजिज्ञासा | सतीश ब. कुलकर्णी |

या लेखमालेच्या “प्राचीन भारतीय पदार्थविज्ञान शास्त्र (भाग-२) मध्ये आपण सध्याच्या काळातील ज्येष्ठ वैज्ञानिकांनी प्राचीन भारतीय पदार्थविज्ञानशास्त्रावर घेतलेल्या प्रमुख दहा आक्षेपांची यादी केली होती आणि नंतरच्या दोन भागांमध्ये त्यापैकी पहिल्या सात आक्षेपांवर सविस्तर चर्चा केली आहे. आज आपण ८ ते १० या आक्षेपांची चर्चा करणार आहोत. आठवा मुद्दा/आक्षेप हा आहे,” विश्वरचनेसंबंधी तीन प्रमुख प्रवाह आहेत.त्यापैकी “महास्फोट”चा विचार सर्वमान्य आहे. पण यापैकी तिन्ही विचारप्रवाहांविषयीचे पुराणवांग्मयातील उदाहरणे देऊन हे सर्व आमच्या पूर्वजांना आधीच माहीत होते, असा दावा केला जातो.” खरं पाहता आता पर्यायी विचारप्रवाहांची संख्या तीनहून अधिक पांच पर्यंत गेली आहे.

हे विश्व विद्युतचुंबकीय शक्तीतून निर्माण झाले आहे, हा एक नवीन विचारप्रवाह आहे. तसेच, हे विश्व म्हणजे एक कॉम्प्युटर प्रोग्रॅम आहे,अशीही एक विचित्र विचारसरणी आहे. एकुण या पाच विचारसरणींपैकी दोन महत्त्वाच्या आहेत. “स्टेडी स्टेट युनिव्हर्स ” या विचारसरणीप्रमाणे या विश्वाला आदी-अंत नाही, ते आहे तसेच अनंतकाळ रहाणार आहे. ते सतत प्रसरण पावत असले तरी निर्माण होणाऱ्या पोकळीमध्ये नवीन विश्वे निर्माण होऊन विश्वाची एकूण घनता तीच रहाते, असा हा विचारप्रवाह मांडणाऱ्या शास्त्रज्ञांचा दावा आहे. पण विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात असे काही पुरावे मिळाले की जे या तोपर्यंत चर्चेत असणाऱ्या या विचारप्रवाहाला छेद देणारे होते.आणि म्हणून ही थिअरी अमान्य झाली आणि दुसरी पर्यायी “बिग-बॅंग” थिअरी मान्य झाली. या विचारसरणीनुसार हे विश्व सुमारे १४००कोटी वर्षांपूर्वी एका विशिष्ट क्षणात निर्माण झाले आणि तेंव्हापासून ते सतत प्रसरण पावत आहे.

त्याक्षणाच्यापूर्वी विश्व कसे होते, याचे स्पष्टिकरण ही विचारसरणी देऊ शकत नाही. ते फक्त त्या क्षणापासून काय काय आणि कसे घडले, हे सांगते. विश्व निर्माण झाल्यानंतर काळ(टाईम) निर्माण झाला. नंतर तारका समूह,ग्रह निर्माण झाले आणि यथावकाश जीवसृष्टी निर्माण झाली. या महास्फोटाच्या त्याक्षणी सगळे विश्व हे एका बिंदूत सामावलेले होते. या बिंदू मध्ये विलक्षण शक्ती आणि उष्णता निर्माण झाली आणि त्याचा प्रचंड स्फोट झाला. त्यानंतरच्या एका सेकंदाचे अनेक भाग करून त्या भागात काय निर्माण झाले, हे सांगणारा आणि आज सर्वमान्य झालेला आधुनिक विज्ञानातील सर्वात महत्त्वाचा सिद्धांत म्हणजे “महास्फोट सिद्धांत”.

आता आपल्या शास्त्रात याविषयी काय माहिती उपलब्ध आहे, हे पाहू. ज्येष्ठ वैज्ञानिकांनी त्यांच्या सवयीप्रमाणे “पौराणिक वांग्मयात” हा शब्दप्रयोग केला आहे. पण पुराणापेक्षाही अधिक समर्पक माहिती ऋग्वेदातील १०व्या मंडलातील १२९व्या सूक्तामध्ये दिली आहे. हे सूक्त “नारदीयसूक्त” म्हणून ओळखले जाते. हे सूक्त फक्त सात श्लोकांचे आहे.पण या सात श्लोकांमध्ये विश्वोत्पत्तीचे वर्णन केले आहे ते जर महास्फोट सिद्धांतात वर्णन केल्याप्रमाणे असेल तर ते जगापुढे आणायला नको कां ? या सूक्ताचा पहिला श्लोक असा आहे.

नासदासीन्नो सदासीत्तदानीं नासीद्रजो नो व्योमा परो यत् |
किमावरीव: कुह कस्य शर्मन्नम्भ: किमासीद् गहनं गभीरम् ||

अर्थ – त्यावेळी (म्हणजे विश्वाच्या उत्पत्तिच्या क्षणी) सत् ही नव्हते आणि असत् ही नव्हते. त्यावेळी लोक नव्हते, आकाश नव्हते आणि दुसरे काहीही नव्हते.अशा परिस्थितीत त्याला कोणी आवरण घातले? आणि कुणासाठी घातले ? त्यावेळी गहन गंभीर आवाज कसला येत होता?.

दुसऱ्या श्लोकात म्हटले आहे की त्यावेळी मृत्यू नव्हता आणि अमृतत्वही नव्हते. काळही नव्हता. ते जे काही होते ते स्वतःच्या शक्तीने वायुशिवाय श्वसन करीत होते.

तिसऱ्या श्लोकात म्हटले आहे की , त्यावेळी प्रकाशही नव्हता.पुढच्या काही श्लोकांमध्ये ऋषींनी आणखी काही प्रश्न स्वतःलाच विचारले आहेत. त्यावेळी एक गहन गंभीर आवाज निर्माण झाला तो कसला होता, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. आता शास्त्रज्ञांनी त्या आवाजाचे मूळही शोधून काढले आहे. वायू शिवाय श्वसन म्हणजे एक प्रकारचे स्पंदन होय. या स्पंदनामुळेच तो स्फोट झाला. अशा रीतीने या सुक्तात विश्वोत्पत्तीचे जे वर्णन केले आहे ते ढोबळमानाने आताच्या बिग-बॅंग सिद्धांताची मिळते-जुळते आहे. तसेच, एकाच वेळी अनेक ब्रम्हांडे असण्याची शक्यता जी शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे, तीसुद्धा आपल्या शास्त्रांमध्ये “अनंत कोटी ब्रम्हांडनायक” अशी व्यक्त झाली आहे.

तेंव्हा जे आहे,जे दिसते,ते सांगण्यात पोकळ अहंकार कसा व्यक्त होतो ? हा माझा या वैज्ञानिकांना प्रश्न आहे. खरे वास्तव हे आहे की तत्वज्ञान आणि विज्ञानाच्या माध्यमातून सनातन वैदिक संस्कृतीतील ऋषी, मुनींनी जे तत्त्वचिंतन केले आहे,ते केवळ अजोड आहे. विशेषत: खगोलशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र किंवा आरोग्य विज्ञानशास्त्र या विषयांमध्ये जे चिंतन त्यांनी केले आणि आजही आपल्याला जे उपलब्ध आहे, ते पाहता असे निश्चितपणे म्हणता येईल की इतर समकालीन संस्कृतीतील चिंतनापेक्षा ते खूपच जास्त विकसित झालेले होते.

पुढचा ९वा मुद्दा: पुराण वांग्मयातील ज्या गोष्टी आज सिद्ध झालेल्या दिसतात तो केवळ योगायोग समजावा. हे विधान एका अत्यंत ज्येष्ठ वैज्ञानिकाने केले आहे. म्हणून ते जास्त खेदजनक आहे. एकीकडे हेच वैज्ञानिक सांगत असतात की विज्ञानामध्ये “योगायोग” असं काही नसतं, प्रत्येक घटनेमागे कुठलातरी कार्यकारणभाव असतोच. मग ज्या घटनांविषयी प्राचीन वांग्मयात सांगितले गेले आहे त्यामागे त्यांचे चिंतन,मनन आणि संशोधन नाही,तो केवळ योगायोग कसा समजला जाईल? उदा. सुरुवातीच्या एका लेखात मी “८४लक्ष योनी” या प्राचीन वांग्मयातील संकल्पनेविषयी लिहिले होते.

आज वैज्ञानिक हे मान्य करतात की पृथ्वीवरील सजीवांची संख्या अदमासे तितकीच असली पाहिजे. आजच्या सारख्या अद्ययावत प्रयोगशाळा नसतानाही त्यांनी अतिशय आत्मविश्वासाने हे विधान केले होते. ते कशाच्या आधारे? त्याचा आधार होता तो ध्यान-धारणा-समाधि या योगिक प्रक्रियेतून त्यांना झालेले आत्मज्ञान! हे मान्य करायला जे एक खुले मन असायला हवे ते या वैज्ञानिकांकडे नसल्याने ते असे हास्यास्पद विधान करत असले पाहिजे. आता शेवटचा मुद्दा – इंग्रजांच्या आगमनानंतरच भारतात विज्ञानयुग सुरू झाले. हे खरे आहे की युरोपात औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली. १६व्या आणि १७व्या शतकात अनेक क्रांतिकारी शोध युरोपमध्ये लागले. या सैद्धांतिक शोधाचे पर्यावसान लौकरच तंत्रज्ञानात झाले आणि त्यामुळे समाजोपयोगी अनेक साधने उपलब्ध झाली.

शिलाईचे यंत्र, वाफेवर चालणाऱ्या यंत्राचा शोध, विजेचा दिवा, दूरध्वनी यंत्र, यांत्रिक हातमाग अशी अनेक साधने बाजारात मिळू लागल्याने सर्वसामान्य समाजाचे दैनंदिन कष्ट मोठ्या प्रमाणात कमी झाले. एका गावाहून दुसऱ्या गावात जाण्यासाठी रेल्वेगाडीची सोय झाली. युरोपिअन समाज हा मुलत: लढाऊ वृत्तीचा आणि व्यापारी वृत्तीचा असल्यामुळे त्यांनी त्यांना अवगत झालेल्या या वैज्ञानिक सुविधांच्या आणि तलवारीच्या जोरावर सगळे जग पादाक्रांत करायला सुरुवात केली. खरे पाहता, सैद्धांतिक विज्ञानाच्या क्षेत्रात भारत हा युरोपापेक्षा आघाडीवर होता.पण भारतात औद्योगिक क्रांती झाली नाही.कारण औद्योगिक क्रांतीचा मुळ उद्देश हा एखाद्या समाजोपयोगी वस्तुंचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करुन आणि ते ग्राहकांना विकुन मोठ्या प्रमाणावर नफा कमावणे,हा असतो. पण असे करताना नैसर्गिक साधनांचा मोठ्या प्रमाणावर र्हास होत असतो आणि आपल्याच भावी पिढ्यांना त्यांचे विपरीत परिणाम भोगावे लागतात. हा शहाणपणा प्राचीन भारतीयांकडे होता. म्हणून त्यांनी औद्योगिकरणापेक्षा मानवी कौशल्य विकसित करण्याकडे अधिक लक्ष दिले.

या मानवी कौशल्याच्या जोरावर त्यांनी औद्योगिकरण न करतानाही जगातला बाजारावर ताबा मिळवून अलोट संपत्ती मिळविली. पण कुटनितीने भारतावर ताबा मिळविल्यानंतर त्यांनी बळजबरीने भारतातही अनेक वस्तू ज्या भारतात हस्तकौशल्याने तयार होत होत्या ,जसे वस्त्रोद्योग, लोखंडाचे उत्पादन आदी वस्तुंचे औद्योगिकरण करुन टाकले. थोडक्यात, भारतात औद्योगिकरणाची सुरुवात करुन अनेक वस्तुंचे उत्पादन यंत्रांच्या सहाय्याने व्हायला लागले तरी भारतात विज्ञानयुग हे इंग्रजांमुळे आले, असे म्हणणे योग्य नाही. विज्ञान युग हे भारतात वेदकाळापासूनच होते. फक्त त्याचे व्यापारीकरण झाले नव्हते. ते इंग्रजांनी बळजबरीने केले. या औद्योगिकरणामुळे भारतात सतत बेरोजगारी वाढत गेली, हे सत्य नाकारता येणार नाही. भारतीय विज्ञान हे तत्वज्ञानाधिष्ठित आहे आणि तत्वज्ञान हे विज्ञानाधिष्ठित आहे. असा अजोड संगम इतर संस्कृतींमध्ये पहायला मिळत नाही.

Dnyaneshwar: