“…हेच आम्हाला 3 तारखेला दाखवून द्यायचंय”, ऋतुजा लटकेंचं मतदारांना भावनिक आवाहन!

मुंबई | Rutuja Latke – शिवसेना आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्वच्या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानंतर आजपासून (15 ऑक्टोबर) त्यांच्या प्रचाराला सुरूवात झाली आहे. प्रचाराला सुरूवात होताच ऋतुजा लटके यांनी लोक मला बहुमताने निवडून देतील. 3 तारखेला सर्वकाही स्पष्ट होईल, असं विधान त्यांनी केलं आहे. त्या प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होत्या.

यावेळी ऋतुजा लटके म्हणाल्या, “रमेश लटके ज्याप्रमाणे गणपती मंदिराचं दर्शन घेऊन प्रचाराला सुरूवात करायचे. तशीच सुरूवात आम्ही केली आहे. माझ्या प्रचार सभेत सगळे आपले जुने शिवसैनिक, कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित आहेत. आजपासून हा प्रचार सुरू होतोय. काल अर्ज दाखल करताना लोकांनी मोठी गर्दी केली होती. रमेश लटके यांच्याबाबत लोकांचं असलेलं प्रेम आणि निष्ठा माझ्यासोबतही कायम असल्याचं यातून दिसलं.”

“पक्षाशी निष्ठावंत असलेले सगळेजण माझ्यासोबत आहेत, हेच आम्हाला 3 तारखेला दाखवून द्यायचं आहे. यासाठी सगळे शिवसैनिक माझ्यासोबत आहेत. लोक मला बहुमताने निवडून देतील, असा मला विश्वास आहे”, असंही ऋतुजा लटके म्हणाल्या.

Sumitra nalawade: