नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. 46 वर्षाच्या सायमंड्सच्या निधनामुळे ऑस्ट्रेलियासह जगभरातील क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला आहे. शनिवारी रात्री 10.30 वाजता सायमंड्सच्या कारला क्वीन्सलँडच्या टाऊन्सविलेजवळ अपघात झाला. त्यावेळी तो स्वतः गाडी चालवत होता. गाडी नियंत्रणात न राहिल्याने ती रस्ता सोडून उलटली त्यात तो मोठ्या प्रमाणात जखमी झाला. आपत्कालीन व्यवस्थापनाने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र जखम जास्त असल्यानं ते शक्य झालं नाही. सायमंड्सच्या अपघाताबद्दल अधिक तपास सुरू असल्याचं तेथील प्रशासनानं सांगितलं आहे.
सायमंड्स एकूण 26 कसोटी सामने खेळला होता. ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघात 1999 ते 2007 या काळात त्याने उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्याच्या काळात ऑस्ट्रेलिया संघाने क्रिकेट विश्वावर राज्य केलं होतं. त्याच्या मृत्यूनंतर सर्व क्रिकेटसह इतर क्षेत्रातील दिग्गजांकडून आणि सायमंड्सच्या चाहत्यांकडून शोक व्यक्त केला जात आहे.