“ऋतुजा लटकेंचा राजीनामा मंजूर न होण्यामागे…”, अनिल परबांचा शिंदे गटावर गंभीर आरोप

मुंबई | Anil Parab On Shinde Group – शिवसेना आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्वच्या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, त्या मुंबई मनपाच्या कर्मचारी असल्यानं त्यांचा राजीनामा अद्यापही मंजूर झालेला नाही. त्यामुळे त्यांची उमेदवारी धोक्यात येण्याची शक्यता आहे. यासंदर्भात ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन शिंदे गटावर (Shinde Group) गंभीर आरोप केले आहेत.

“रमेश लटके एक निष्ठावंत शिवसैनिक होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या परिवाराला न्याय मिळावा या हेतूनं आम्ही त्यांच्या पत्नी ऋतुजा लटकेंना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. त्या मुंबई मनपाच्या कर्मचारी असल्यानं त्यांनी 2 सप्टेंबर रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला. मात्र, मुंबई मनपा प्रशासनाकडून त्यांचा राजीनामा अद्यापही मंजूर झालेला नाही. त्यांचा राजीनामा मंजूर होऊ नये यासाठी महापालिका प्रशासनावर दबाव आणला जात आहे”, असा आरोप अनिल परब यांनी केला आहे.

पुढे ते म्हणाले, “आम्ही जेव्हा ऋतुजा लटकेंना उमेदवारी देणार असल्याचं सांगितलं त्यानंतर त्यांनी 2 सप्टेंबर रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. एक महिन्यानंतर जेव्हा त्या राजीनामा आणण्यासाठी गेल्या तेव्हा त्यांनी चुकीच्या पद्धतीने राजीनामा दिला असल्याचं मनपा प्रशासनाकडून सांगण्यात आलं. त्यानंतर त्यांनी 3 ऑक्टोबर रोजी पुन्हा राजीनामा दिला. नियमानुसार कोणत्याही कर्मचाऱ्याला राजीनामा देताना एक महिनाआधी सुचना द्यावी लागते. अन्यथा एक महिन्याचा पगार कोषागारात जमा करावा लागतो. मात्र, ऋतुजा लटके यांचे 30 दिवस पूर्ण होत नसल्यानं त्या पैसे भरण्यास तयार आहेत, तरीही त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आलेला नाही. त्यांचा राजीनामा मंजूर होऊ नये यासाठी मनपा प्रशासनावर दबाव आहे.”

Sumitra nalawade: