वैविध्यपूर्ण भाषावैभव असलेल्या भारतात मातृभाषेतील शिक्षणाला महत्त्व दिले पाहिजे. भारतीय शिक्षण पद्धतीला नवीन आकार येत असताना फिनलंडसारख्या शिक्षण क्षेत्रात अव्वल असलेल्या देशाकडून त्यांचे शिक्षणतंत्र शिकून त्याचा उपयोग भारतासाठी करणे ही काळाची गरज असल्याचे मत माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.
पुणे ः फिनलंड येथील शिक्षण क्षेत्रात सृजनशील काम करणारे आणि फिनलंड येथील कौन्सिल फॉर क्रिएटिव्ह एज्युकेशन (सीसीई) हेरंब कुलकर्णी आणि शिरीन कुलकर्णी यांनी लिहिलेल्या ’शिक्षणगंगा फिनलंडमधून आपल्या दारी’ या पुस्तकाचे प्रकाशन आज अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.
एम.आय.टी. विश्वशांती विद्यापीठाच्या ज्ञानेश्वर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एम.आय.टी. शिक्षण समुहाचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड होते. यावेळी व्यासपीठावर पुस्तकाचे लेखक आणि फिनलंड येथील कौन्सिल फॉर क्रिएटिव्ह एज्युकेशन या संस्थेचे संस्थापक हेरंब कुलकर्णी, फिनलंड येथील सीसीईच्या शिक्षणतज्ज्ञ नेल्ली लुहिवूरी आणि ख्रिस्तोफ फेनीव्हेसी, डॉ. रत्नदीप जोशी आणि सीसीईच्या भारतातील मुख्य समन्वयक धनिका सावरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना अविनाश धर्माधिकारी म्हणाले की, आपल्या संस्कृतीमध्ये आई आणि वडिलांनंतर गुरूचे स्थान महत्त्वाचे मानले आहे. तसेच समाजामध्ये देखील शिक्षकाचे स्थान वरचे असले पाहिजे. शिक्षकांवर पहिली जबाबदारी असते ती म्हणजे विद्यार्थ्यांची आई होण्याची. विद्यार्थ्यांवर शिक्षकांनी निरपेक्ष प्रेम केले तर त्या प्रेमातून होणारी अभिव्यक्ती अधिक प्रभावी होईल. शिक्षण क्षेत्रात अशा प्रयोगशील पुस्तकांची नितांत गरज आहे. ग्रंथांचा व्यवहार म्हणजे संस्कृतीचे लेणे आहे.
त्यामध्ये अशा पुस्तकांची भर पडली, तर निश्चितच देशाच्या शिक्षण धोरणाला अधिक योग्य दिशा मिळण्यास हातभार लागेल. यावेळी बोलताना हेरंब कुलकर्णी म्हणाले की, फिनलंड हा अतिशय गरिब देश होता, पण गेल्या तीस वर्षात फिनलंडने केवळ आपल्या आर्थिक नाही, तर सर्वांगिण विकासावर भर दिला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.