पुणे : जातीच्या भिंतीपलीकडचा अण्णा भाऊंचा ऐतिहासिक सुसंवाद संस्कृतीच्या विकासाचे अधिष्ठान आहे. प्रतिभावंत आणि कलावंतांना धर्म नसतो. अण्णा भाऊ तर विश्वस्वातंत्र्याचे पाईक होते. एकूणच त्यांनी ज्ञानेश्वरांच्या पसायदानातील विश्वात्मकता गौरवून संतत्व पूजले, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कारप्राप्त दुर्वा एजन्सीतर्फे प्रकाशित आणि प्रसिद्ध व्याख्याते वि. दा. पिंगळेलिखित लोकशाहीर अण्णा भाऊ साठे या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते झाले.
त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर दुर्वा एजन्सीचे प्रकाशक शैलेंद्र कदम, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव संदीप कदम, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य राजेश पांडे, मसापचे कार्यवाह अॅड. प्रमोद आडकर, क्रांतिसूर्य लहुजी साळवे स्मारक समितीचे अध्यक्ष विजय डाकले आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, की वर्तमान जगात एकच धर्म आणि एकच महापुरुष पुरेसा नाही. विश्वाच्या कल्याणासाठी बहुसांस्कृतिक एकात्मता महत्त्वाची आहे. शाहिरांचे प्रचारिक अनुबंध कॉ. डांगे, डॉ. आंबेडकर, आचार्य अत्रे आणि अगदी अमरशेखपासून यशवंतराव चव्हाणांपर्यंत त्यांच्या अर्पणपत्रिकेतून स्वयंसिद्ध आहेत. तेव्हा अण्णा भाऊ विश्वात्मक कलावंत आहेत.
रुपाली चाकणकर म्हणाल्या, की अण्णा भाऊंनी त्यांच्या साहित्यातून वंचित, शोषित आणि दुर्बळ घटकांचे दुःख आणि व्यथा मांडल्या. त्यांच्या साहित्यातून विषमता दूर करण्याचे प्रयत्न केले. परंतु, आज भारताच्या सर्वोच्च पदी महिला विराजमान होत असताना नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथील शाळेत केवळ मासिक धर्म आला, म्हणून वृक्षारोपणासाठी विद्यार्थिनीला रोखले जाते. हा विरोधाभास आजही समाजात दिसून येतो, हे विषण्ण करणारे चित्र आहे.