मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मशिदींवरील भोंग्यासंदर्भात दिलेल्या अल्टिमेटमनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवाय, यावरून मोठ्याप्रमाणावर आरोप-प्रत्यारोप देखील सुरू झाले आहेत. सर्वच पक्षातील नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसंच राज ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच पुण्यातील पत्रकारपरिषदेत बोलताना दोन मोठ्या घोषणा केल्या होत्या. ”५ जून रोजी माझ्या सर्व सहकाऱ्यांसह मी अयोध्येला जाणार आहे आणि महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे रोजी औरंगाबादमध्ये सभा घेणार आहे.” असं ते म्हणाले होते. यामुळे नव्या राजकीय चर्चांना उधाण आलेलं असतानाच, आता मनसेकडून आणखी एक घोषणा करण्यात आली आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर राज्यभरातील मंदिरामध्ये मनसे कार्यकर्ते महाआरती करणार आहे. याबाबतची माहिती मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी दिली आहे.
”महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते ३ मे रोजी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर राज्यभरात त्यांच्या स्थानिक मंदिरांमध्ये ‘महाआरती’ करतील. लाऊडस्पीकरचा वापर करून ही महाआरती केली जाईल.” असं सरदेसाई यांनी सांगितलं आहे.