अमृतसर | पंजाबमधील अमृतसर मधुन एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. दोन दिवसात दुसऱ्यांदा स्फोटाची घटना घडली आहे. दरबार साहिब हेरिटेज स्ट्रीटजवळ सोमवारी सकाळी 6:30 वाजता आणखी एक स्फोट झाला. शनिवारी रात्री उशिरा घडलेल्या घटनेपासून 200 मीटर अंतरावर हा स्फोट झाला. घटनेच्या वेळी रस्त्यावर फारशी रहदारी नव्हती. अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, घटनेचा तपास करत आहेत.
याआधी शनिवारी रात्री उशिरा सुवर्ण मंदिराजवळील हेरिटेज स्ट्रीटवरही स्फोट झाला होता. यामध्ये एक जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे तर काही इमारतींच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. मात्र, हा दहशतवादी हल्ला नसून अपघात असल्याचे पोलिसांनी सांगितले होते.