श्रीशा वागळे
अँड्यू सायमंड्स अनेक वादांमध्येही अडकला. पबमधलं भांडण असो किंवा मैदानावरचा वाद असो, अनेक प्रकरणांमध्ये सायमंड्सचं नाव आलं. एखादं वादळ घोंघावावं आणि शांत व्हावं, तसंच त्याच्याबद्दल घडलं. अँड्यू सायमंड्स नावाचं वादळ क्रिकेटच्या मैदानात घोंघावलं. मात्र आता हे वादळ कायमचं शांत झालं आहे.
अँड्यू सायमंड्स… क्रिकेटविश्वातला एक स्फोटक फलंदाज. तो फलंदाजीला आल्यावर मैदानावर जणू वादळच घोंघावू लागायचं. त्याची बॅट तळपू लागल्यावर चौकार, षटकारांची बरसात व्हायची. हरभजन सिंगसोबतच्या ‘मंकी गेट’ प्रकरणामुळे सायमंड्स चांगलाच चर्चेत आला. पण अपघाती मृत्यूमुळे आता हे वादळ शांत झालं आहे. त्याच्या अशा आकस्मिक निघून जाण्याने क्रिकेटविश्वही पुरतं हादरून गेलं.
आधी शेन वॉर्न आणि आता अँड्यू सायमंड्स… ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या नभांगणात चमचमणारे हे तारे हे जग कायमचं सोडून गेले आहेत. या दोन खेळाडूंचा अकाली आणि अकस्मात झालेला मृत्यू क्रिकेटविश्वाला धक्का देऊन गेला. शेन वॉर्नच्या अकाली मृत्यूच्या धक्क्यातून क्रिकेटविश्व नुकतंच कुठे सावरत असताना अँड्यू सायमंड्सच्या अपघाती निधनाची बातमी आली आणि अवघं क्रिकेटविश्व पुन्हा एकदा दु:खाच्या खाईत लोटलं गेलं. सायमंड्सचा अवघ्या ४६ व्या वर्षी झालेला मृत्यू सर्वांनाच चटका लावून गेला. अँड्यू सायमंड्स म्हटल्यावर भारतीय क्रिकेट चाहत्यांना ‘मंकी गेट’ प्रकरण आठवतं. हरभजन सिंग आणि सायमंड्समधला हा वाद चांगलाच गाजला होता. मात्र त्याहीपलीकडे जाऊन सायमंड्समधल्या क्रिकेटच्या गुणवत्तेला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. धिप्पाड आणि उंचापुरा सायमंड्स कोणताही चेंडू अगदी लीलया सीमापार टोलवायचा.
सायमंड्स खेळपट्टीवर असेपर्यंत प्रतिस्पर्धी संघाच्या मनात कायमच पराभवाची धास्ती असायची. त्याच्याकडे सामना एकहाती फिरवण्याची क्षमता होती आणि याच क्षमतेच्या बळावर त्याने ऑस्ट्रेलियाला बरेच विजयही मिळवून दिले. सायमंड्स हा अष्टपैलू खेळाडू. फलंदाजी हे बलस्थान असलं तरी तो चांगली गोलंदाजीही करायचा. सायमंड्स दर्जेदार क्षेत्ररक्षकही होता. त्यामुळे हा कोणत्याही संघाला हवाहवासा वाटणारा असाच खेळाडू होता. ९ जून १९७५ रोजी इंग्लंडच्या बर्मिंगहॅममध्ये त्याचा जन्म झाला. त्याच्या जन्माच्या दोन दिवस आधी एकदिवसीय क्रिकेटच्या पहिल्यावाहिल्या विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली होती.
तीन महिन्यांचा असताना केन आणि बार्बरा सायमंड्स यांनी अँड्यूला दत्तक घेतलं. हे जोडपं लहानग्या अँड्यूला घेऊन ऑस्ट्रेलियाला निघून गेलं. त्यानंतर ऑस्ट्रेलिया हीच त्याची कर्मभूमी बनली. जन्मभूमी असलेल्या इंग्लंडकडून खेळायचं की ऑस्ट्रेलियाकडून, असा पेच निर्माण झाल्यानंतर त्याने ऑस्ट्रेलियाची निवड केली. सायमंड्सला लहानपणापासूनच क्रिकेटमध्ये गती होती. त्याला १९९४ मध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेट अकादमीची शिष्यवृत्तीही मिळाली होती.
१९९५ मध्ये तो ग्लॉसेंस्टेशायर संघाकडून इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळला. त्याच वर्षी त्याला क्रिकेट रायटर्स क्लबचा सर्वोत्तम युवा क्रिकेटपटूचा पुरस्कारही मिळाला. त्याने या हंगामात ५००० पेक्षा अधिक धावा करीत आणि १०० पेक्षा अधिक बळी घेत आपल्या गुणवत्तेची चुणूक दाखवली. सायमंड्स क्रिकेट कारकिर्दीत चार इंग्लिश काउंटी संघांकडून खेळला. १० नोव्हेंबर १९९८ ला त्याने ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय संघात पदार्पण केलं. पाकिस्तानविरुद्ध तो पहिला सामना खेळला. मात्र त्याच्या कारकिर्दीची सुरुवात काहीशी डळमळीतच झाली.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये ९० हून अधिक स्ट्राईक रेट असणारा हा फलंदाज सुरुवातीला आपला प्रभाव पाडू शकला नाही. त्याच्या बॅटमधून धावा निघत नव्हत्या. गोलंदाजीही चांगली होत नव्हती. मात्र क्षेत्ररक्षणात तो छाप पाडत होता. धावा अडवत होता आणि हेच त्याच्या पथ्यावर पडत होतं. सायमंड्सला सुरुवातीला ऑस्ट्रेलियन संघात जम बसवण्यात अपयश येत होतं. मात्र २००३ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत मिळालेल्या संधीचं सायमंड्सनेही सोनं केलं. २००३ च्या विश्वचषकात शेन वॉटसन दुखापतीमुुळे बाहेर पडला. अमली पदार्थांच्या सेवनामुळे शेन वॉर्नवर विश्वचषकात खेळण्यास बंदी घालण्यात आली.
डॅरेन लेहमनवर घालण्यात आलेल्या बंदीचा कालावधी संपला नव्हता आणि मायकल बेव्हन दुखापतग्रस्त होता. त्यामुळे अँड्यू सायमंड्सला संघात घेण्याशिवाय ऑस्ट्रेलिया संघव्यवस्थापनाकडे दुसरा पर्याय नव्हता. ही संधी सोडायची नाही, असा निर्धार सायमंड्सने केला. त्याने विश्वचषकातल्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला दणका दिला. ऑस्ट्रेलियाची अवस्था चार बाद ८६ अशी झाली असताना सायमंड्स फलंदाजीला आला आणि नाबाद १४३ धावा करून संघाला तारलं. सायमंड्सच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाला ८ बाद ३१० एवढी धावसंख्या गाठता आली. २००३ ची विश्वचषक स्पर्धा त्याच्या कारकिर्दीला नवी दिशा देऊन गेली. सायमंड्सने ऑस्ट्रेलियाच्या संघातलं स्थान पक्कं केलं. यानंतर त्याची गणना ऑस्ट्रेलियाच्या प्रमुख खेळाडूंमध्ये होऊ लागली.
एकदिवसीय सामन्यांमधल्या दमदार कामगिरीच्या बळावर सायमंड्सने कसोटी संघातही स्थान मिळवलं. २००४ मध्ये श्रीलंका दौर्यावर गेलेल्या ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघात तो होता. श्रीलंकेतल्या फिरकीला पोषक खेळपट्ट्यांवर सायमंड्सची डाळ शिजली नाही. मुथय्या मुरलीधरनच्या फिरकीपुढे त्याचं काही एक चाललं नाही. दोन कसोटीतल्या चार डावांमध्ये त्याला २५ पेक्षा अधिक धावा करता आल्या नाहीत. त्यामुळे त्याला तिसर्या कसोटीत डच्चू देण्यात आला. एकदिवसीय सामन्यांप्रमाणेच त्याला कसोटीमध्येही सुरुवातीला फारसं यश मिळालं नाही. त्यामुळे तो कसोटी संघाच्या आत-बाहेर होत राहिला. सायमंड्स २६ कसोटी सामने खेळला. त्याने कसोटीत १४६२ धावा केल्या आणि २४ बळी मिळवले. त्याची कसोटी कारकीर्द फारशी बहरली नाही. त्याने १९८ एकदिवसीय सामन्यांमध्ये ५०८८ धावा केल्या, तर १३३ बळी मिळवले. २००९ मधल्या डेक्कन चार्जर्सच्या आयपीएल विजयात त्याचा महत्त्वाचा वाटा राहिला. २०११ मध्ये तो आयपीएलमधला अखेरचा हंगाम खेळला.
अँड्यू सायमंड्स अनेक वादांमध्येही अडकला. पबमधलं भांडण असो किंवा मैदानावरचा वाद असो, अनेक प्रकरणांमध्ये सायमंड्सचं नाव आलं. एखादं वादळ घोंघावावं आणि शांत व्हावं, तसंच त्याच्याबद्दल घडलं. अँड्यू सायमंड्स नावाचं वादळ क्रिकेटच्या मैदानात घोंघावलं. मात्र आता हे वादळ कायमचं शांत झालं आहे. अँड्यू अनंताच्या प्रवासाला निघून गेला आहे.