“… तर मैतासाठीच या”; अवकाळी पावसामुळे मोडून पडलेल्या शेतकऱ्याची उद्विग्न प्रतिक्रिया

बीड : जिल्हाभरात अवकाळी पावसासह गारपिटीने चांगलेच झोडपले आहे. यामुळे फळबागा आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. एवढेच नव्हे तर गारपीट आणि नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे बीडच्या काही भागांमध्ये शेतकऱ्यांची जनावरेही दगावली आहेत. या मोठ्या प्रमाणात झालेल्या शेती नुकसानीमुळे काही शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले आहेत.

महिनाभरापूर्वी देखील बीड जिल्ह्यात गारपीट झाली होती. त्यामधून सावरत असतानाच काल झालेल्या अवकाळी पावसाने उरलीसुरली शेतीही उद्ध्वस्त झाली, त्यामुळे शेतकऱ्यांची पुन्हा उभारी घेण्याची उमेदच मोडून पडली आहे. मात्र, शासनाकडून अपेक्षित प्रतिसाद आणि मदत न मिळाल्यामुळे अनेक शेतकरी हवालदिल झाले आहेत. आता पंचनामे करण्यासाठी नको तर मैतासाठीच या, अशा प्रकारच्या उद्विग्न प्रतिक्रिया शेतकऱ्यांमध्ये उमटताना दिसत आहेत.

या अवकाळी पावसामुळे फळबागासह पालेभाज्या, ज्वारी, गहू, मका यासोबतच ऊस देखील पूर्णपणे जमीन दोस्त झाला आहे. या रात्रीच्या अघोरी पावसाने शेतकऱ्याला खरंच आम्ही वाचतो की नाही असं वाटू लागलं आहे. मात्र फक्त नुकसान आणि जीवित हानीवर रात्रीचा पाऊस थांबला नाही.

या पावसात आष्टी असेल पाटोदा केज त्यासोबत जिल्ह्यातील अनेक तालुक्यात या गारपिटीने हाहाकार माजला. काही तासांसाठी झालेल्या या गारपिटीमुळे बीड जिल्ह्यात हिमालय सदृश्य परिस्थीती अतिवृष्टीमुळे पाहायला मिळाली. आता या शेतकऱ्यांना पंचनामे लवकरात लवकर करणे देखील गरजेचे आहे. रात्रीचा प्रसंग सांगताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकार काय मदत करतंय हे पाहाणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

Prakash Harale: