खरेदीदार, अडते आणि ग्राहक त्रासले
पुणे : श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डामध्ये शेतमाल चोरी आणि सिक्युरीटीच्या मुजोरीमुळे खरेदीदार, अडते आणि ग्राहक कमालीचे त्रासले आहेत. प्रशासनाने तातडीने यंत्रणेमध्ये बदल करून सुरक्षितता वाढवावी, अशी मागणी अडत्यांनी केली आहे.
श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील वाढत्या चोऱ्या रोखण्यासाठी बाजार समितीकडून ‘मेस्को’ (महाराष्ट्र राज्य माजी सैनिक महामंडळ) या संस्थेच्या सुरक्षारक्षकांची नियुक्ती केली आहे. बाजार आवारात सुरक्षारक्षक नेमल्यानंतर चोऱ्या होण्याचे प्रमाण कमी झाले नाही. त्यामुळे अडत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मार्केट यार्डातील बाजार आवारात सकाळी सात ते दुपारी दोनपर्यंत गर्दी असते. त्यानंतर बाजार आवारातील गर्दी कमी होती. सायंकाळी बाजार आवारात फारसे कोणी नसते. शेतीमालाची आवक रात्री सुरू होते.
बाजार आवारात सीसीटीव्ही कॅमेरे जागोजागी बसविल्यास चोऱ्या कमी होतील. सुरक्षारक्षकांकडून खरेदीदारांशी वाद घातले जातात. त्याची तक्रार केल्यानंतर कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळे त्यांची मुजोरी वाढली आहे. दरम्यान, बाजार समितीने नेमण्यात आलेले सुरक्षारक्षक गस्त घालत नाही. आमचे काम फक्त प्रवेशद्वारावर थांबण्याचे आहे. बाजार आवारात गस्त घालण्याचे काम आमचे नाही, असे सुरक्षारक्षक सांगतात. सुरक्षारक्षकांच्या निष्क्रियतेमुळे बाजारातील चोऱ्या वाढल्या आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड म्हणाले, ‘अडते संघटना बाजार आवारातील काही जणांकडून दादागिरीची भाषा केली जाते व नियमांचे पालन होत नाही. ’ त्यामुळे सुरक्षारक्षक आणि त्यांच्यात वाद होतात. विनाकारण अरेरावी करू नका, अशा सूचना सुरक्षारक्षकांना देण्यात आल्या आहेत. बाजार आवारातील गस्त वाढविण्यात आली आहे.–