रेशन दुकानदारच बनलेत एजंट
पुणे : येरवडा (ई) विभाग रेशनिंग कार्यालय अंतर्गतच वरिष्ठ अधिकाऱ्याने चक्क वसुलीसाठी दुकानदारांचीच नेमणूक केल्याने व रेशनिंग दुकानदारच एजंट बनल्याने येरवडा परिसरात हा चर्चेला उधाण आले असून, अशा अधिकाऱ्यावर व दुकानदार एजंटावर कठोर कारवाई न झाल्यास पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाचे शहराध्यक्ष अन्वर पठाण यांनी दिला. येरवडा रेशनिंग (ई) विभाग कार्यालय अंतर्गत जवळपास अंदाजे १३५ ते १५० रेशनिंग दुकानांचा समावेश या कार्यालय अंतर्गत करण्यात आला असून यामध्ये प्रामुख्याने येरवडासह विश्रांतवाडी, धानोरी, लोहगाव, वडगाव शेरी, चंदननगर, खराडी या उपनगरांचा समावेश करण्यात आल्याने येथील कार्यालयात रेशनिंगच्या विविध कामासाठी नागरिकांची नेहमीच वर्दळ मोठ्या प्रमाणात दिसून येते.
त्यातच सध्या बेरोजगारीला आळा बसावा व महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने केंद्र शासनाच्या वतीने बचत गटाची स्थापना करून महिलांना रोजगार मिळावा या उद्देशाने त्या माध्यमातून महिलांना रेशनिंगचा परवाना दिल्याने आज अनेक भागांनी महिला ह्या रेशनिंग दुकान चालवत असल्या. तरी पण हे कागदोपत्रीच असून त्यावर वर्चस्व मात्र त्यांच्या पतिराजांचे चालत असल्यामुळे महिलांचा स्वयंरोजगार हा फक्त कागदोपत्री राहिलेला असून त्यावर वर्चस्व मात्र पतिराजांचे दिसून येत आहे. त्यामुळे शासनाची दिशाभूल करून ही एक प्रकारची फसवणूकच होत असल्याने आज तरुणांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढले असताना त्यांना मात्र असा रोजगार देण्यासाठी शासनाकडून मात्र अंगठा दाखविण्याचे काम केले जात आहे. यामुळे महिलांच्या व रेशनिंगच्या नावाखाली पतीराजाकडून धान्याचा काळाबाजारात मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे अनेक दुकानादाराकडून हप्ते वसुली करण्यासाठी चक्क वरिष्ठ अधिकाऱ्याने दोन दुकानदारांची नेमणूक केल्याने हा परिसरात चर्चेचा विषय बनला असला, तरी महिन्याला लाखो रुपयांची हप्ते वसुलीची उलाढाल होत असल्याची चर्चा आहे.
रेशनिंग (ई ) विभाग कार्यालयात अशा प्रकारे भ्रष्टाचार होत असेल, तर जनतेला न्याय मिळून देण्यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरू
–
शहराध्यक्ष, भाजप अल्पसंख्याक मोर्चा
एखाद्या या भागात नवीन व्यक्तीसाठी नवे रेशनिंग कार्ड काढण्यासाठी चक्क दुकानदारच एजंटचे काम करत असल्यामुळे एखाद्या वेळेस वरिष्ठ अधिकाऱ्याला देखील या भागात दुकानदारच एजंट असल्याचा थांगपत्ता देखील लागत नाही. त्यामुळे येथील कार्यालयात कार्यरत असलेले वरिष्ठ अधिकारी देखील तो मी नव्हेचची भूमिका घेत सर्वासमोर देखावा करत आहेत. त्यामुळे संबंधित कार्यालय अंतर्गत लाखोंचा भ्रष्टाचार होत असल्याचे समोर आले आहे. नवीन शिधापत्रिका काढण्यासाठी नागरिकांचे सर्व कागदपत्र असतानादेखील त्यांना ह्या ना त्या कारणाने व शिधापत्रिकेसाठी असणारी लाच त्यांच्याकडून मिळत नसल्यामुळे अशा नागरिकांना नवीन शिधापत्रिका मिळविण्यासाठी विलंब लागत असल्याने त्यांना कार्यालयात चकरा मारण्याशिवाय पर्याय राहत नाही.