जेजुरी देवस्थान विश्वस्तांच्या धर्मादाय आयुक्तांनी केलेल्या नेमणुका घटनेनुसार

आंदोलनातील काही व्यक्ती खोटी माहिती पसरवत आहेत : विश्वस्त

पुणे : श्री मार्तंड देवस्थान जेजुरीच्या (Jejuri) विश्वस्त निवडीवरून सध्या वाद सुरू असून या पार्श्वभूमीवर, धर्मादाय आयुक्त पुणे विभाग यांच्या वतीने करण्यात आलेल्या सात विश्वस्तांची निवड घटनेनुसार करण्यात आली आहे. तसेच नवनियुक्त विश्वस्त राजकीय पक्षांशी निगडीत असल्याचा आरोप चुकीचा असून या निवडीमध्ये सर्वसमावेशक व उच्चविद्याविभूषित लोकांना पसंती देण्यात आली आहे. ज्यामध्ये डॉक्टर, वकील, व्यावसायिक, बँक अधिकारी अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश आहे, अशी माहिती श्री मार्तंड देवस्थान जेजुरीच्या नवनियुक्त सात विश्वस्तांनी पत्रकार परिषदेत दिली.

विश्वस्तांपैकी अध्यक्ष पोपटराव खोमणे, मंगेश घोणे व डॉ. राजेंद्र खेडेकर हे मूळ जेजुरी गावचे रहिवासी आहेत. अ‍ॅड. विश्वास पानसे व अभिजीत देवकाते हे जेजुरी पंचक्रोशीतील निवासी आहेत. अ‍ॅड. पांडुरंग थोरवे हे पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष व अनिल सौंदडे हे उद्योगपती व उत्तम व्यवस्थापन करणारे व्यक्तिमत्त्व आहे. कोणत्याही विश्वस्ताला न्यायालयाने आजपर्यंत दोषी ठरवून शिक्षा सुनावलेली नाही.

तसेच, सदर नियुक्तीच्या वेळी कोणत्याही शिफारस पत्राचा वापर करण्यात आलेला नाही. किंबहुना माननीय सह धर्मादाय आयुक्त यांनी कोणाच्याही दबावाला बळी पडून किंवा शिफारस पत्राच्या आधारे सदर नियुक्त्या केल्या नाहीत. आंदोलनातील लोक खोटी माहिती पसरवत आहेत, असे यावेळी विश्वस्तांनी स्पष्ट केले.

Dnyaneshwar: