पुण्यात काँग्रेसमध्ये वाहणार आता नवे वारे; शहराध्यक्षपदी अरविंद शिंदे

पुणे शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी अरविंद शिंदे यांची नियुक्ती झाली. त्यांना शुभेच्छा देताना दैनिक ‘राष्ट्रसंचार’चे मुख्य संपादक अनिरुद्ध बडवे आणि प्रतिनिधी राजेंद्र पंढरपुरे.

पुणे : काँग्रेस पक्षाचे (Indian National Congress Pune) शहराध्यक्ष रमेश बागवे यांचा राजीनामा झटपट स्वीकारून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पुणे शहर काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षपदी माजी नगरसेवक अरविंद शिंदे (aravind Shinde) यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे शहर काँग्रेसमध्ये आता चिकाटी, उत्साह, चैतन्याचे नवे वारे वाहू लागले आहेत.

अवघ्या चार महिन्यांपूर्वी बागवे यांचे अध्यक्षपद मुदतीनंतरही पुढे चालू ठेवण्यात आले होते. अखिल भारतीय काँग्रेस पक्षाने ‘एक व्यक्ती एक पद’ असे धोरण जाहीर केले. त्यानुसार बागवे यांनी प्रदेश उपाध्यक्षपद ठेवले आणि शहर अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा येताच पटोले यांनी प्रभारी अध्यक्ष म्हणून अरविंद शिंदे यांची नियुक्ती केली. काँग्रेस पक्षात निर्णय रेंगाळत ठेवले जातात, पण पुण्याच्या अध्यक्षपदाचा घोळ न घालता निर्णय झाला.

येत्या तीन महिन्यांत पुणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्याची पूर्वतयारी करण्याची संधी मिळावी, असाही हेतू प्रभारी अध्यक्ष नेमण्यामागे आहे. इंग्लिश, हिंदी आणि मराठी या तिन्ही भाषांवर शिंदे यांचे प्रभुत्व आहे. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचार काळात वेगवेगळ्या व्यासपीठावर पक्षाची बाजू शिंदे सर्रासपणे मांडू शकतील, हेही शिंदे यांच्या निवडीमागचे कारण असावे.

शिंदे हे पुणे रेल्वे स्टेशन परिसरातून महापालिकेवर सातत्याने निवडून येत असून, महापालिकेत गटनेतेही होते. कसबा विधानसभा मतदारसंघातून २०१९ मध्ये त्यांनी पक्षातर्फे निवडणूक लढविली होती. लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीतही त्यांचे नाव उमेदवारीच्या स्पर्धेत होते.

पक्षाची नवीन कार्यकारिणी करताना त्यांना ५० टक्के युवकांना प्राधान्य द्यावे लागेल. शिवाय पक्षात पाच वर्षांहून अधिक काळ पदांवर असलेले उपाध्यक्ष, खजिनदार, सरचिटणीस यांना वगळण्याचा निर्णय शिंदे यांना घ्यावा लागणार आहे. त्या जागी त्यांना नव्या नेतृत्वाला संधी द्यावी लागेल.

महापालिकेच्या २००२, २००७, २०१२, २०१७ च्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची घसरण झालेली आहे. २०१७ मध्ये तर अवघे १० उमेदवार निवडून आले. पक्षाची ही घसरण थांबवण्याचे आव्हान शिंदे यांच्यापुढे आहे. शिवाय महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेबरोबर वाटाघाटी करताना काँग्रेस पक्षाला अधिकाधिक जागा पक्षाच्या पदरात पाडून घेण्यासाठी शिंदे यांना राजकीय कौशल्य दाखवावे लागेल तसेच पक्षाच्या कामात शिस्त आणावी लागेल.

Dnyaneshwar: