जालना : (Arjun Khotkar joins the Shinde group) चार दिवसांपासून तळ्यात मळ्यात करणारे जालना जिल्ह्यातील शिवसेनेचे दिग्गज नेते अर्जुन खोतकर यांनी आज शिवसेनेला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ करत आपण मुख्यमंत्री यांच्या गटाला पाठिंबा देत असल्याची घोषणा केली. यावेळी निर्णय घेताना खोतकरांना अश्रू अनावर झाले.
दरम्यान, दिल्ली मुक्कामी असलेल्या खोतकरांनी आपण जालन्याला जाऊन माझी भूमिका स्पष्ट करणार आहे असे सांगितले होते. त्यानुसार त्यांनी आज त्यांची भुमिका स्पष्ट केली आहे. यावेळी ते म्हणाले, शिवसेनेच्या माध्यमातून अनेक संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा निवडणुकीत जनतेने आमच्या पदरात यश टाकले. त्याबद्दल त्यांनी मतदारांचे व पक्षनेतृत्वाचे देखील मी मनापासून आभार व्यक्त केले.
यावेळी खोतकर म्हणाले, मी ४० वर्षांपासूनचा सच्चा शिवसैनिक आहे पण, घरी आलो की परिवार दिसतो. त्यामुळे काही निर्णय घेणे गरजेचे असतात, असे सांगून मी पक्षप्रमुखांकडे परवानगी मागितली आहे. ते मला यासंदर्भात जे काही बोलायचे ते बोलले. त्यामुळे मी आज आपल्या सर्वांच्या साक्षीने माझ्या शिवसैनिकांच्या साक्षीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थन करण्याचा निर्णय घेतला आहे.