मुंबई : (Arjun Khotkar will Shinde group Join) जालना जिल्ह्यातील शिवसेनेचे दिग्गज नेते अर्जून खोतकर हे शिंदे गटात जाणार असल्याच्या अफवा शिंदे-खोतकर-दानवे यांच्या दिल्ली भेटीपासून रंगत आहेत. शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंनी खोतकरांवर विश्वास दाखवत शिवसेना ‘उपनेते’ पदाची मोठी जबाबदारी आहे. तर आदित्य ठाकरेंच्या औरंगाबाद येथिल शिवसंवाद निष्ठा यात्रेत देखील त्यांनी आपण शेवटपर्यंत शिवसेनेसोबत राहणार असल्याच सांगितले होते.
मात्र, तीन दिवसाच्या दिल्ली मुक्कामी असलेल्या खोतकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या सोबत भेटीगाठी घेतल्या आहेत. पण, आपण शिवसेनेतच आहोत अशी माहिती खोतकरांनी माध्यमांना दिली होती. त्यानंतर शुक्रवार दि. 29 रोजी त्यांनी शिंदे गटाचे खासदार राहूल शेवाळे, खा. श्रीकांत शिंदे, आमदार अब्दुल सत्तार यांनी खोतकरांची मनधरणी केली असल्याचे बोलले जात आहे. चर्चेनंतर माध्यमांशी बोलताना सत्तार म्हणाले, मुख्यमंत्री 31 जुलै रोजी सिल्लोड दौऱ्यावर आहेत, त्यांच्या उपस्थितीत खोतकर जाहीर प्रवेश करणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली.
ईडीच्या कारवाईमुळे खोतकर शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा होती. मात्र खोतकर यांनी या अफवा असल्याचा खुलासा केला होता. तर अजूनही आपण शिवसेनेत असून, फोटोवर अंदाज बांधू नका असे खोतकर म्हणाले होते. तर आपण आज महाराष्ट्रात जावून उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करुन निर्णय घेणार असल्याचे खोतकरांनी सांगितले आहे.