आरोग्यवारी उपक्रमाचा झाला शुभारंभ
पुणे : आजपासून सुरू होणार्या पंढरपूर वारीमध्ये सहभागी होणार्या महिला वारकर्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याकरिता राज्य महिला आयोगाच्या वतीने ‘आरोग्यवारी’ उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. पुण्यातील पालखी विश्रामस्थळ असलेल्या निवडुंगा विठोबा मंदिर येथे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या हस्ते हा शुमारंभ करण्यात आला आहे. पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्हा प्रशासनाला, वारी काळात दर दहा ते वीस कि.मी. अंतरावर वारकरी महिलांसाठी शौचालय व न्हाणी घराची व्यवस्था करणे, सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग व सॅनिटरी नॅपकिन बर्निंग मशीन उपलब्ध करून देणे, आदी सुविधा या उपक्रमाच्या माध्यमातून देण्यात येत असल्याची माहिती रुपाली चाकणकरांनी दिली आहे.
गेली दोन वर्षे आषाढी पायी वारीत मोठा खंड पडला होता. मात्र आता कोरोनाचा संसर्ग आवाक्यात आल्याने राज्य सरकारने सर्व निर्बंध हटवले आहेत. या दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर यावर्षी येत्या २१ जून रोजी पालखी सोहळ्याला सुरुवात होत आहे. या सोहळ्यासाठी वारकर्यांनीही जय्यत तयारी सुरू केली आहे. पण यंदाची पालखी ही महिला वारकर्यांसाठी ऐतिहासिक ठरणार आहे. याचे कारणही तसेच आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाची वारी ऐतिहासिक ठरणार आहे. यंदा प्रथमच वारकरी महिलांना वारीदरम्यान आरोग्यविषयक अत्याधुनिक सोयीसुविधा पुरवण्यात येणार आहेत. यात महिला वारकर्यांना विसावा कक्ष, स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष, सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन यांची सुविधा पुरविण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्याला वारकरी संप्रदायामुळे समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभला आहे. संतांनी आपल्या जनजागृती कार्याच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात आध्यात्मिक लोकशाही स्थापन केली आहे.