कोल्हापूर | Arun Gandhi Passed Away – महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांचे नातू अरूण गांधी (Arun Gandhi) यांचं कोल्हापुरात निधन झालं आहे. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तसंच आज (2 मे) कोल्हापुरात अरूण गांधी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती त्यांचे पुत्र तुषार गांधी यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली आहे. (Arun Gandhi Passed Away)
गेल्या दोन महिन्यांपासून अरूण गांधी कोल्हापुरात वास्तव्यास होते. ते मणिलाल गांधी यांचे पुत्र आहेत. अरूण गांधी यांचा जन्म 14 एप्रिल 1934 रोजी झाला होता. तसंच त्यांनी आजोबा महात्मा गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवत सामाजिक कार्यात सहभाग घेतला होता.
अरूण गांधी यांचं द गिफ्ट ऑफ अँगर: अँड अदर लेसन्स फ्राॅम माय ग्रॅन्डफादर महात्मा गांधी हे पुस्तक प्रसिद्ध आहे. काही वर्षांपूर्वी अरूण गांधी हे अमेरिकेत वास्तव्यास होते. तसंच महात्मा गांधींप्रमाणे ते अहिंसेच्या मार्गाचं पालन करत होते. यासाठी त्यांनी अहिंसेशी संबंधित क्रिश्चियन ब्रदर्स युनिव्हर्सिटीमध्ये एक संस्था स्थापन केली होती.