नवी दिल्ली | Arvind Kejariwal – आम आदमी पक्षानं (Aam Aadmi Party) दिल्ली महापालिका निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांनतर आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा उल्लेख केला आहे. आम्हाला पंतप्रधान मोदींचा आशीर्वाद आणि केंद्र सरकारचं सहकार्य हवं आहे, असं केजरीवालांनी म्हटलं आहे.
अरविंद केजरीवाल यांनी भाषणाच्या सुरुवातीला ‘माझंही तुमच्यावर प्रेम आहे’, असं म्हणत मतदारांचे आभार मानले. दिल्लीमध्ये ‘आप’च्या विजयामुळे आता डबल इंजिनचं सरकार असणार आहे. 2015 पासून या ठिकाणी राज्यात ‘आप’ची सत्ता असून आता महानगरपालिकेवरही आपने झेंडा फडकवला आहे.
“आम्हाला केंद्र सरकारची मदत हवी आहे. पंतप्रधान आणि केंद्राच्या आशीर्वादाची गरज आम्हाला आहे. या निवडणुकीमधून लोकांना सकारात्मक राजकारणाची आवश्यकता असून नाकारात्मक राजकारण त्यांनी दूर केलं आहे”, असं केजरीवाल म्हणाले.
पुढे ते म्हणाले, “मी सर्व पक्ष आणि उमेदवारांना आवाहन करतो की आजपर्यंत आपण राजकीय वाद घातले. मात्र, आता आपल्याला एकत्र काम करायचं आहे. आम्हाला भाजप आणि काँग्रेसचं सहकार्य हवं आहे. आपण एकत्र येऊन दिल्लीतील समस्या सोडवू”, असंही केजरीवाल म्हणाले.