मुंबई : (Arvind Sawant On Ambadas Danave) राज्यातील सत्तासंघर्षामुळे मंत्रीमंडळ विस्तार लांबणीवर पडला त्यामुळे अधिवेशन देखील लांबणीवर टाकण्यात आले. परंतू सध्याच्या घडामोडी पाहता विधीमंडळाचं अधिवेशन पुढील आठवड्यात सुरु होण्याची शक्यता आहे. यामुळे विधानपरिषदेच्या विरोधीपक्ष नेतेपदावर शिवसेनेने दावा केला आहे. यासाठी शिवसेनेने औरंगाबादचे आमदार अंबादास दानवे यांनी अधिकृतरित्या अर्जही दाखल केला आहे.
या सर्व पार्श्वभुमीवर आता विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीकडे तर विधानपरिषदेचं विरोधी पक्षनेते पद शिवसेनेकडे जाणार आहे. या संदर्भात अजित पवार म्हणाले, विधानपरिषदेत जेवढी काँग्रेसची संख्या तेवढीच राष्ट्रवादीची संख्या आहे. आमच्या दोन्ही पक्षांपेक्षा शिवसेनेची संख्या दोन ने जास्त आहे. आमची संख्या प्रत्येकी १० आहे तर शिवसेनेची संख्या १२ आहे. त्यानुसार, सध्याचा निर्णयही शिवसेनेच्या बाजूने होऊ शकतो.
तर शिवसेना खासदार अरविंद सावंत म्हणाले, आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेतेपदावर आमचे आमदार अंबादास दानवे यांना हे पद देण्यात यावं अशी शिफारस उपसभापतींकडे केली आहे. याबाबतचं पत्र मी उपसभापतींना दिलं आहे. त्यामुळं हे पद आम्हालाच मिळेल आहे असे मत त्यांनी व्यक्त केलं आहे.