“देर आये दुरूस्त आये…”, राज्यपालांच्या पदमुक्त होण्याच्या इच्छेवर अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया

मुंबई | Arvind Sawant – राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) हे आपल्या पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. आपल्याला पदमुक्त व्हायचं आहे, अशी इच्छा भगतसिंग कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याकडे व्यक्त केली आहे. याबाबतची माहिती राजभवनानं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकातून देण्यात आली आहे. दरम्यान, यासंदर्भात शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी प्रतिक्रिया दिली. ते टीव्ही 9 वृत्तवाहिनीशी बोलत होते.

यावेळी अरविंद सावंत म्हणाले की, देर आये दुरुस्त आये! राज्यपाल कोश्यारींनी (Governor Bhagat Singh Koshyari) घटनाबाह्य ज्या गोष्टी केल्या आहेत, त्याचं पापक्षालन राजीनाम्यानं होणारं नाही. मात्र, हे उशीरा सुचलेल शहाणपण आहे. राज्यपालांनी ज्या मुख्यमंत्र्यांना शपथ दिली, ती कोणाच्या शिफारसीवरून दिली, हे आजपर्यंत महाराष्ट्राला कळलेलं नाही. मात्र, अशा परिस्थिती सर्वाधिक संख्या असलेल्या पक्षाला सत्तास्थापन करण्यासाठी बोलावलं जातं. त्यानंतर राजकीय पक्ष बैठक घेऊन नेता निवडला जातो. मात्र, अशी कोणतीही बैठक झाली नाही, असा कोणताही नेता निवडला गेला नाही. तरी त्यांना कोणी सांगितलं की एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्री पदाची शपथ द्यायची आहे? असा प्रश्नही सावंत यांनी उपस्थित केला.

राज्यपाल नेमकं काय म्हणाले?

”महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यपाल, राज्यसेवक होण्याचा बहुमान मिळणं हे माझ्याकरिता अहोभाग्य होतं. राज्यातील जनसामान्यांकडून गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ मिळालेलं प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही. नुकत्याच माननीय पंतप्रधानांच्या झालेल्या मुंबई दौऱ्यात आपण राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आपणास माननीय पंतप्रधानांचा विशेष स्नेह नेहमीच लाभत आला आहे आणि आशा आहे की या संदर्भात देखील त्यांचा मला आशिर्वाद मिळत राहील,” असं राजभवनानं आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

Sumitra nalawade: