ओढ पंढरीच्या विठुरायाची

आषाढी एकादशीला पंढरपूरला पायी चालत जाण्याची जुनी प्रथा आहे. तिसर्‍या शतकात पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराची निर्मिती करण्यात आली. तुम्ही कधी वारीला गेलात का? गेला नसाल तर एकदा अवश्य जा. ज्या दिवशी तुम्ही वारीला जाल तो तुमच्या आयुष्यातला मोलाचा दिवस असेल. विठ्ठलनामाचा गजर करीत भक्तीत तल्लीन होऊन लाखो वारकरी पंढरपूरला पायी चालत जातात. त्यावेळी भक्तीचा महासागर तयार होतो. तो महासागर पाहिला, की मन विठ्ठलमय होते.

आषाढी एकादशीला आळंदीहून पहिली दिंंडी इ. स. १२९१ मध्ये निघाली, असा उल्लेख आढळतो. पूर्वी वारकरी पादुका गळ्यात बांधून वारीसाठी जात असत. हैबतरावांनी त्या पादुका पालखीतून नेण्याची प्रथा सुरू केली. पंढरपूरला जाताना रिंगण, भारुडासाठी पालख्या थांबवून कार्यक्रम व्हायचे. पालख्यांच्या मुक्कामाची ठिकाणे ठरलेली आहेत. अशा एकेका ठिकाणी मुक्काम करीत वारकरी ओढीने पंढरीपर्यंत पोहोचतात.

प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर वारकरी पंढरीच्या वाटेकडे चालत निघाले आहेत. कितीही अडचणी आल्या तरी पायी वारीचा नियम न चुकवणार्‍या भक्तांना कोरोनाच्या संसर्गापुढे मान तुकवावी लागली आणि दोन वर्षं वारीसोहळ्यात व्यत्यय सोसावा लागला. घरामध्ये कोंडून घेतलेल्या अवस्थेत विठ्ठलाचे स्मरण करण्याखेरीज हाती काहीही उरले नाही. यामुळे दरवर्षी प्रचंड मोठा समुदाय भेटायला येण्याची सवय असणारा विठुरायाही खचितच दु:खी झाला असावा. कोरोनामुळे सगळी देवालये भक्तांच्या वावराविना सुनी सुनी दिसत होती. पंढरीरायाचे देऊळही त्याला अपवाद नव्हते. विठ्ठल हा भक्तांच्या प्रेमाला आसुसलेला देव. खरे तर तो त्यांचा सखाच… भक्तांच्या अडचणी जाणून त्यांच्या भेटीस धावून जाणारा हा त्यांचा सोयरा… पण या सोयर्‍याच्या दर्शनाविना दोन वर्षे काढल्यानंतर समस्त वारकरी संप्रदायाला या दिवसांची प्रतीक्षा होती.

आषाढ शुक्ल एकादशीला चातुर्मास सुरू होऊन कार्तिकी एकादशीला समाप्त होतो. चातुर्मासातले हे दिवस पावसाळ्याचे असतात. या दिवसात चलनवलन कमी असते. हे लक्षात घेऊन उपवास केले जातात. या दिवसात पावसामुळे बरेच लोक घरात असतात. ते घरात राहिल्याने रामायण, महाभारत, भागवत अशा धार्मिक ग्रंथांचे वाचन करण्याची प्रथा पडली असावी. आषाढी एकादशीचा उपवास हे आधुनिक काळातले डाएटिंग आहे. उपवासामुळे शरीर हलके, मन शुद्ध राहते, म्हणूनच आषाढीचे महत्त्व वर्षानुवर्षे टिकून आहे.

वारी हा विठ्ठलाच्या दर्शनाचा सोहळा आहेच, खेरीज तो सामाजिक अभिसरणाचा, प्रबोधनाचा, समाजातल्या एकात्मकतेचा, परंपरा जतनाचा, समृद्ध संतसाहित्याची मौखिक परंपरा जपण्याचा आणि एकमेकांची ऊराऊरी भेट घेत सगळ्यांचे मंगल चिंतण्याचा हृद्य सोहळाही आहे. म्हणूनच वारी हा प्रवास नसतो, तर ते एक आनंदनिधान असते. आता याच आनंदलहरी आपण अनुभवत आहोत. सर्व संतांच्या पालख्या पंढरीच्या दिशेने निघाल्या आहेत. नेहमीच्या रिवाजाप्रमाणे ठरलेल्या वेळी त्या पंढरीत दाखल होतील आणि एकादशीचा आनंद द्विगुणीत होईल.

आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला प्रारंभ होतो. आषाढी एकादशीबाबत एक कथा सांगितली जाते. मूर नावाचा एक दैत्य होता. एकदा तो भगवान विष्णूवर चाल करून गेला. भगवान विष्णूने सर्व देवांना बरोबर घेऊन त्या दैत्याशी युद्ध केले. पण सर्व देव एकत्र असूनही त्या दैत्यापुढे त्यांचे काही चालले नाही. त्यानंतर विष्णू एका गुहेत दडून बसले. त्या ठिकाणी शस्त्रास्त्रांनी सज्ज असणारी एक पराक्रमी स्त्री होती. मूर दैत्य विष्णूंचा पाठलाग करीत त्या गुहेपर्यंत येऊन पोहोचला. त्यावेळी त्या पराक्रमी स्त्रीने आपल्या एका हुंकाराने दैत्याला ठार केले. त्यामुळे भगवान विष्णू त्या स्त्रीवर संतुष्ट झाले आणि त्यांनी तिला वर मागण्यास सांगितले. त्यावेळी एकादशीचा उपवास करणार्‍यांवर तुम्ही प्रसन्न व्हावे, असे ती स्त्री म्हणाली. त्यावर भगवान विष्णूंनी तिला ‘तथास्तु’ म्हटले. तेव्हापासून अनेकांनी हे व्रत करण्यास सुरुवात केली.

संत तुकाराम, संत एकनाथ यांनी आपल्या अभंगातून आषाढी आणि सर्वच एकादशींचे महत्त्व सांगितले आहे. आषाढी एकादशीचा उपवास करून नामसंकीर्तन करावे, असे संतांनी सांगितले आहे. वारकरी संप्रदायामध्ये आषाढी, कार्तिकी एकादशीबरोबरच माघी एकादशी, चैत्र शुक्ल एकादशीला पंढरपूरची वारी करण्याला फार महत्त्व आहे. विठोबा वारकरी संप्रदायाचे दैवत आहे. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम अशा संतश्रेष्ठांनी वारकरी संप्रदायासाठी मोठ्या वाङ्मयीन साहित्याची निर्मिती केली. ‘पंढरपूरची वारी करतो तो वारकरी’ अशी व्याख्या विद्वानांनी केली आहे. प्रा. सोनोपंत दांडेकर म्हणतात, ‘आषाढी, कार्तिकी, माघी किंवा चैत्र शुक्ल एकादशी यापैकी एका एकादशीला गळ्यात तुळशीची माळ घालून पंढरपूरला जातो तो भक्तिभावात न्हालेला वारकरी आणि उपासनेचा मार्ग म्हणजे वारकरी पंथ.’

Sumitra nalawade: