“मग घ्या ना धौती योग…”, आशिष शेलारांचा शिवसेनेला खोचक टोला

मुंबई | Ashish Shelar On Shivsena – आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत भाजप (BJP) विरूद्ध शिवसेना (Shivsena) राजकारण चालू असल्याचं दिसत आहे. दोन्ही पक्ष मुंबईत आपापली ताकद दाखवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. यादरम्यान, आज (28 सप्टेंबर) शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपच्या ‘मराठी दांडिया’वर टीकास्र सोडलं आहे. त्यालाच आता भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ट्विटरवरून एक खुलं पत्र शेअर करत खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.

शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपच्या ‘मराठी दांडिया’वर टीका केली आहे. ‘कमळाबाईंचा आता मराठी दांडिया’ अशा शब्दांत भाजपच्या या उपक्रमाची खिल्ली उडवत भाजपवर निशाणा साधला आहे. “महापालिकेवरील भगवा झेंडा खाली खेचण्यासाठी भाजपच्या कमळाबाई अनेक युक्त्या आणि क्लृप्त्या करीत आहे. एका बाजूला मराठी लोकांत फूट पाडायची तर दुसऱ्या बाजूला शाकाहार, मांसाहार असे विषय घेऊन इतर प्रांतीय, समाजाला वेगळं करायचं असं त्यांतं एकंदरीत धोरण आहे. लालबाग, परळ, शिवडी या शतप्रतिशत भगव्या प्रदेशात कमळाबाईने खास मराठी दांडियाचे आयोजन करून मराठी मतदारांना आपलंसं करण्याचा प्रयत्न चालवला आहे”, असं अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे.

शिवसेनेकडून करण्यात आलेल्या या टीकेला आशिष शेलार यांनी खुलं पत्र लिहून खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे. “ज्यांनी राम वर्गणीची खिल्ली उडवली..ज्यांनी अडीच वर्षे मंदिरात देवाला बंदिवान केले, ज्यांनी दहिहंडी, गणेशोत्सव, नवरात्र उत्सव बंद करायला लावले त्यांना आता शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर मुंबईत उत्सवाची धूम सुरू आहे ते पाहून पोटात मळमळ होतेय, मुरड मारतेय. म्हणूत ते ‘सामना’तून जळजळ व्यक्त करीत आहेत. ज्यांना मराठी माणसाचे उत्सव आणि आनंद बघून मळमळ, जळजळ होतेय, त्यांना आमचा एकच सल्ला ‘मग घ्या ना धौती योग!’ असं म्हणत आशिष शेलारांनी खोचक टोला लगावला आहे.

‘कोरोना, वादळ, अतिवृष्टी अशा प्रत्येक संकटात भाजपचे नेते, पदाधिकारी, मंत्री, कार्यकर्ते अडचणीच्या काळात घरात बसून राहिले नाहीत, घरोघरी जाऊन मदत करीत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संस्कार आमच्यावर आहे. त्यामुळे आम्ही कधीच जे केले त्याचे ‘करुन दाखवले’ असे होर्डिंग लावले नाहीत’, असंही त्यांनी या पत्रात म्हटलं आहे.

 बाळासाहेबांची सेवा करणारे चंपासिंग थापा शिवसेनेची साथ सोडून एकनाथ शिंदे गटात दाखल झाल्यावरूनही आशिष शेलारांनी टोला लगावला आहे. ‘पण आम्ही म्हणजेच उत्सव अशा थापा मारणाऱ्यांकडे आता ‘थापा’पण राहिला नाही आणि उत्सवही. यावेळी आम्ही सण उत्सवाची केवळ मुंबईतील आकडेवारी देऊन गर्वहरण केले. त्यावेळी मात्र जळजळ व्हायला लागली”, असंही शेलार पत्रात म्हणाले आहेत.

‘गिरणगावात म्हणजे लालबाग, परळ, शिवडीमध्ये मराठी दांडिया भाजपने आयोजित केला त्याचा त्रास ‘सामना’कारांना आणि पेग्विन सेनेला एवढा का झाला? अर्थात याकूबच्या कबरीचे सुशोभीकरण करणाऱ्यांना मराठी दांडियाचा त्रास होणारच”, असं देखील या पत्रात त्यांनी म्हटलं आहे.

Sumitra nalawade: