लंकेला १७४ धावांचे आव्हान; रोहितने टीमला तारले

दुबई : रोहित शर्मा (७२), सूर्यकुमार यादव (३४) यांच्या फलंदाजीमुळे भारताने सुपर ४ मधील श्रीलंकेविरूध्दच्या करो वा मरो लढतीत २० षटकांमध्ये ८ बाद १७३ धावांपर्यंत मजल मारली. २ बाद १३ धावांवरून रोहित व सूर्यकुमारने ९७ धावांची महत्वपूर्ण भागीदारी करून संगाला तारले. श्रीलंंकेला विजयासाठी १७४ धावांचे आव्हान दिले.

दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडिअमच्या मैदानावर श्रीलंका संघाचा कर्णधार दासून शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारताची सुरूवात केएल राहूल व रोहित शर्माने केली. दुसऱ्याच षटकात महेश तिक्शानाने केएल राहूलला (६) त्रिफळाबाद करून पहिला धक्का दिला (१/११). तिसऱ्या षटकात दिलशान मधुशनाकाने विराट कोहलीला (०) बाद त्रिफळाबाद करून दुसरा धक्का दिला (२/१३). महेश व दिलशानने आपल्या कर्णधाराने घेतलेला निर्णय सार्थ ठरविला.

तिसऱ्या षटकापर्यंत भारताची स्थिती २ बाद १३ अशी होती. नंतर मात्र रोहित व सूर्यकुमार सावधगिरी बाळगून फलंदाजी करीत होते, पण या दोघांना धावफलक सुध्दा हलता ठेवणे आवश्यक होते. आठव्या षटकात भारताच्या ५० धावा फलकावर लागल्या. यावेळी रोहित ३५ व सूर्यकुमार ७ धावांवर खेळत होते. या दोघांनी संघाची धावसंख्या वाढविण्यास सुरूवात केली. एका बाजूने रोहित सावधगिरी बाळगून फटके मारत होता. दुसरीकडे सूर्यकुमार बचावात्मक खेळत होता. रोहितने असिथा फर्नांडोच्या १० व्या षटकात चौकार मारून आपले अर्धशतक पूर्ण केले.

रोहितने ३२ चेंडूत चार चौकार व दोन षटकार मारले. १२ व्या षटकात रोहित व सूर्यकुमार जोडीने संघाच्या शंभर धावा फलकावर लावल्या. यावेळी रोहित ६६ (३९ चेंडू, ४ चौकार व ३ षटकार) व सूर्यकुमार २१ धावांवर (१ चौकार, १ षटकार) खेळत होते. १३ व्या षटकात चमिका करूणारत्नेने भारताला धक्का दिला. त्याने रोहित शर्माला ७२ धावांवर झेलबाद केले (३/११०). रोहितने ४१ चेंडूत पाच चौकार व चार षटकार ठोकले व आपल्या संघाला अडचणीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी सूर्यकुमार ३४ धावांवर खेळत होता. रोहितच्या जागी हार्दिक पंड्या फलंदाजीला आला.

१५ व्या षटकात दिलशान मधुशनाकाने भारताच्या सूर्यकुमार यादवला ३४ धावांवर झेलबाद केले. (४/११९). यादवच्या जागी रिषभ पंत फलंदाजीला आला. रिषभने आल्या आल्या तीन चौकार मारले. भारताची मदार आता या दोघांवरच होती. १८ व्या षटकात शनाकाने हार्दिक पंड्याला झेलबाद केले. पंड्या १७ धावांवर बाद झाला. त्याने १२ चेंडूत १ षटकार मारला. (५/१४९) पंड्याच्या जागी दिपक हूडा फलंदाजीला आला. शनाकाच्या पहिल्या चेंडूवर हूडाने चेंडू मागे मारला. पण तो नो बॉल असल्यामुळे बचावला.

१९ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर मधुशनाकाने हूडाला ३ धावांवर त्रिफळाबाद केले (६/१५७). मधुशनाकाने पंतला सुध्दा पॅव्हेलिअनचा रस्ता दाखविला. पंतने १७ धावा केल्या (७/१५८). आता आर अश्विन व भुवनेश्वर कुमार मैदानावर होते. शेवटच्या षटकात करूणारत्नेने भुवनेश्वरकुमारला शून्यावर त्रिफळाबाद केले. (८/१६४). अश्विनने एक षटकार मारला. अश्विन १५ तर अर्शदीप १ धाव काढून नाबाद राहिले.

Dnyaneshwar: