Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय नेमबाजांची चमकदार कामगिरी सुरू आहे. भारताने आतापर्यंत एकुण ३४ पदकं पटकावली आहेत. यापैकी १९ पदकं ही नेमबाजांनी जिंकून दिली आहेत.
पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन इव्हेंटमध्ये भारताने सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे. भारताला सुवर्णपदक मिळवून देण्यात स्वप्निल कुसाळेसह ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर, अखिलेश वरण यांनी मोलाची भुमिका बजावली आहे.
कोल्हापूरकर स्वप्निल कुसाळेने ५९१, ऐश्वर्या प्रताप सिंग तोमरने ५९१ आणि अखिलेशवरण ५८७ गुणांची कमाई केली. एकुण १७६९ गुणांची कमाई करत अंतिम फेरीत चीनला धुळ चारली. या सांघीक यशानंतर कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यामध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. तसेच घवघवीत यशानंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
स्वप्निल ने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सुवर्णपदके पटकावत दर्जेदार कामगिरी केली असून पुढील वर्षी २०२४ मध्ये होणाऱ्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धेसाठीही तो पात्र ठरला आहे. आता ऑलिंपिक स्पर्धेतही त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.