एक तरी ओवी अनुभवावी

-प्रकाश पागनीस

।।जय श्री राम।।
।।ज्ञानेश्वर माऊलींचे दर्शन।।
।।अ. १३वा.”म्हातारपण असे आहे।।

भीती कुणाला असते. ज्याला सत्य स्वीकारता येते.यालाच जीवनातील अनित्य म्हणतात. म्हातारपणाविषयी माऊलींनी किती सावध केले आहे. मी, माझे कुटुंब विचार करता करता म्हातारपण केव्हा येईल कळणार नाही. मग तक्रारी सुरू होतात. घरात कोणी विचारीत नाहीत. मित्र तोंड फिरवतात. हात-पाय दुखतात पण तुमची बकबक ऐकण्यासाठी कोणीच थांबत नाहीत. यासाठी तरुणपणी मस्तीत घालवले हेच ते वृद्ध विसरून जातात. म्हणून वृद्धत्व या संबंधीच्या शेवटच्या ओव्या वाचा, अंतर्मुख व्हा, हेच माऊलींचे सांगणे लक्षात घ्या.
कुळवाडी रिणे दाटली।कां वांकडिया ढोरे बैसली। तैसी नुठील कांही केली।
जीभचि हे।।५६५।।
कुसळे कोरडी।वारेनि जाती बरडी।
तैसी आपत्ति तोंडी ।दाढियेसी।।५६६।
आषाढींचेनि जळे।जैसी झिरपती शैलाची मौळे। तैसे खांडीहूनि लाळे।
पडती पूर।।५६७।।
वाचेसि अपवाडु।कानी अनघडु।
पिंड गरुवा माकडु।होईल हा।।५६८।।
तृणाचे बुजवणे।आंदोळे वारेगुणे।
तैसे येईल कांपणे ।सर्वांगासी।।५६९।।
पायां पडती वेंगडी।हात वळती मुरकुंडी।
बरवेपणा बागडी।नाचविजैल।।५७०।
मळमूत्रद्वारे।होऊन ठाकती खोंकरे।
नवसिये होती इतरें।माझ्या निधनी।।५७१।।
देखोनि थुंकील जगु।मरणाचा पडेल पांगु।
सोयरिया उबगु।येईल माझा।।५७२।।
स्त्रिया म्हणती विवसी।बाळे जाती मुर्च्छी।
किंबहुना चिळसी ।पात्र होईन।।५७३।
उभळीचा उजगरा।सेजिया साईलिया घरा।
शिणविल म्हणती म्हातारा। बहुतांते।।५७४।।
ऐसी वार्धक्याची सूचणी।आपणिया तरुणपणी। देखे मग मनी। विटे जो गा।।५७५।।
भावार्थ: ओवी-५६५ते५७५:
जसे शेतकरी शेतातील पीक हातात येईपर्यंत कर्जाने बेजार होतो. पावसाने झालेल्या चिखलात बसलेल्या गायी, म्हशी पटकन उठू शकत नाहीत. तशी म्हातारपणी जीभ जड होते, बोलता येत नाही. माळरानावर गवतांची कुसळे वारा आला की उडू लागतात, तशी म्हातारपणी वाढलेली पांढरी दाढी वारा आला की उडत राहते. आषाढ महिन्यातील पावसामुळे गळक्या छपरातून पाणी पाझरावे तसे म्हातारपणी तोंडातून लाळ गळते. बोबडे बोलणे बोलावे लागते. कानाने बहिरेपण येते. शरीर थकलेल्या माकडासारखे दिसेल.
शेतातील बुजगावण्यासारखे शरीर हलके वाऱ्याने हलणारे होईल, अंग थरथर कापणारे होईल. पायातील ताकद गेल्याने पाय चालताना कापतील. हातात लुळेपणा येईल. आजचे तारुण्य संपल्यावर तुम्ही सोंग व्हाल. लघवी, शौचाला जाणे यावरील नियंत्रण जाऊन तुम्ही गळकी मडकी व्हाल. तुम्ही मरावे म्हणून लोक नवस बोलतील. तुम्हाला पाहून लोक तिरस्काराने थुंकतील. ओळखीची माणसे तुम्हाला कंटाळतील. आसपासच्या स्त्रिया तुम्हाला भुत आले म्हणून घाबरतील.लहानमुले तुम्हाला पाहून बेशुद्ध पडतील. सर्वच माणसे तुम्हाला पाहून किळस वाटून घेतील. तुमचे शेजारी जेव्हा तुम्हाला खोकल्याची उबळ येईल रात्रभर झोपू शकणार नाहीत. म्हणतील म्हातारा मरत का नाही? अशा रीतीने म्हातारपणी काय होईल हे समजल्यावर संन्यस्तपणे राहू लागतो.
।।काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल।
नांदतो केवळ पांडुरंग।।

Sumitra nalawade: