एक तरी ओवी अनुभवावी

साधक भक्ती, ज्ञान, कर्म, योग या मार्गांनी परमेश्वराशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत असतो. भक्त भगवंत यात मानवी दोषच भगवंतांपासून आपणास दूर ठेवतात. अ.१३व्यात आपण मानवी दोषांची उजळणीच करीत आहोत. प्रस्तुत ओवींमधून आपण “जन्म, वार्धक्य, मरण” यांच्या काळजींनी खंतावलेला साधक पाहतो आहे. ज्ञानेश्वर माऊलींचे अगोदरचे विचारवंत आद्यशंकराचार्य होय. त्यांनी चर्पटपंजरी स्तोत्रात भगवान श्रीकृष्ण यांचे भजन करणे हे मानवाचे परमकर्तव्य आहे. असे स्पष्ट सांगतात. ते म्हणतात:-
भज गोविंदम्‌‍ भज गोविंदम्‌‍ !
गोविंदम्‌‍ भज मूढमते !
प्राप्त संन्निते मरणे नही रक्षती !
डुकृड्ग करणे!!

भगवंतांनी अ.२मधील सांख्य योगात आत्मा अमर असून, देह मरणाधिन आहे सांिगतले. मरणाचे दु:ख, जन्माचा आनंद ज्ञानी करीत नाहीत. या सांख्ययोगाला पुरक विचारच माऊलींनी प्रस्तुत ओव्यात मांडले आहेत.
आणि जन्ममृत्युदु:खें! व्याधिवार्धक्यकलुषे!
इये आंगा न येता देखे!दुरूनि जो!!५३५!!
साधकु विवसिया!कां उपसर्गु योगिया!
पावे उणियापुरिया!वोथंबा जेवी!!५३६!!
वैर जन्मातरीचे!सर्पा मनौनि न वचे!
तेवी अतीता जन्माचे!उणे जो वाहे!!५३७!!
डोळा हरळ न विरे!घायी कोत न जिरे!
तैसे काळीचे न विसरे!जन्म दु:ख!!५३८!!
म्हणे पुयगर्ते रिगाला!अहा मूत्ररंध्रे रिगाला!
कटा मिया चाटिला!कुचस्वेदु!!५३९!!
ऐसिऐसियापरी!जन्माचा कांटाळा धरी!
म्हणे आता ते न करी!जेणे ऐसे होय!!५४०!!
हारी उमचावया!जुंवारी जैसा ये डाया!
कीं वैरा बापाचेया!पुत्र जचे !!५४१!!
मारलियाचेनि रागे!पाठिचा सूड मागे!
तेणे आक्षेपे लागे!जन्मापाठी!!५४२!!
परी जन्माती ते लाज!न सांडी जयाचे निज !
संभाविता निस्तेज !न जिरे जेवी!!५४३!!
आणि मृत्यु पुढे आहे! तोचि कल्पांति पाहे!
परि आजिची होये !सावधु जो!!४४५!!

गत जन्मांतील वासनांचे अतृप्ततेतून आताचा वर्तमान जन्म आपणास मिळतो हा भगवत गीतेचा सिध्दांत आहे. माऊलींना असेच वाटते म्हणून ओवी क्र.५३५ ते ५४४ यातून उत्तर जन्म का मिळतो. ज्ञानीमाणसे मोक्ष प्राप्तिसाठी काय यत्न करतात हे विचार मांडतात.

भावार्थ : ज्ञानी साधक नेहमीच जन्म, मरण यांचा विचार तटस्थपणे करतो.आजारपण, म्हातारपण अटळ आहे. त्याचा तो स्वीकार करतो. सहन करतो. दु:ख काळजी तो करीत नाही. जसे मांत्रिकाला गुप्त खजिना हवा असेल तर गुप्त धनाचे रक्षण करणारे पिशाच्याला तो हाकलून लावतो. योग साधनेला अयोग्य जागा योगी सोडून देऊन साधना करतो. जसे इमारतीचे बांधकाम काटकोनात होण्यासाठी मुकादम, गवंडी वोळंबा वापरतो.तसे भगवंताच्या साधनेतील दोष कसे दूर करावे साधक जाणतो. साप डुख धरुन सूड घेतो. जर त्याला या जन्मात शत्रुला दंश करता आला नाही तर तो पुन्हा जन्म घेऊन दंश करुन शत्रुला मारतो. तसे आपण वर्तमान जन्म कोणत्यातरी पूर्व जन्मातील अपुऱ्या वासनांची पूर्तता करण्यासाठी घेतला आहे, हे ज्याला लक्षात येते तो वासनांत न गुंतण्याचे प्रयत्न करतो. आपल्या डोळ्यात गेलेला कण डोळ्यातील पाण्यात विरघळत नाही. आपल्याला शस्त्राचा घाव दु:ख देत राहतो. तसे प्रारब्ध योग पूर्वजन्मातून मिळतात. आपल्याला प्रत्येक्ष जन्माला येण्यापूर्वी गर्भावस्था मिळते.रामदास स्वामी यांचे वर्णन करतात.
अधोमुख रे दु:ख त्या बाळकासी!! आपण खाली डोकेवर पाय अवस्थेत असतो.जन्माला येताना मूत्रमार्गातुन बाहेर येतो.स्वत:हाचे अन्न सुध्दा आपल्याला स्तनपानातुन प्राप्त करावे लागते. ही गर्भावस्था चुकवण्यासाठी भक्ती उपासना करायला नको काय अर्थात हे विचार अध्यारत आहेत. जन्मजन्माचा कंटाळा येतो त्यांनी आपले मरण येण्यापूर्वीच मोक्षविचार करायला हवा.
नाहीतर जुगारी माणुस जुगारात पैसे हारला तरी उसने पैसे घेऊन पुन्हा जुगार खेळतो.बापाचा खून करणारा शत्रुला पोरगा ठार मारतो. मोठ्या भावाला मारणारा शत्रुला धाकटा भाऊ मारतो.अशा रितीने सूड वाईट उपभोग यातून जन्ममरणाचे चक्र सुरू राहते. म्हणून ज्ञानी साधक मरण येणार आपण मरणाचे आधीन आहोत हे समजुन घेऊन वाईट वासनात अडकत नाही. शुध्द सात्विक भक्तीमार्गाचे अवलंबन करतो.
!!संतांचे संगती मनोमार्गे गती!
आकळावा श्रीपती येणे पंथे!!

-प्रकाश पागनीस

Nilam: