एक तरी ओवी अनुभवावी

अंतरंगात प्रेरणा आहे. तर शरीराने कर्म घडते.चांगले कर्म चांगल्या विचारांशिवाय झाले असे होत नाही.
तैसे कर्मावरिलेकडां।न सरे थोर मोले कुडा। नव्हे मदिरेचा घडा।पवित्र गंगे।।४७१।।
म्हणोनि अंतरी ज्ञान व्हावें।मग बाह्य लाभेल स्वभावे। वरि ज्ञानकर्मे संभवे।
ऐसे के जोडे।।४७२।।
यालागीं बाह्य विभागु।कर्मे धुतला चांगु।
आणि ज्ञानें फेडिंला वंगु। अंतरिचा।।४७३।।
तेथ अंतरबाह्य गेलें।निर्मळतत्व एक जाहले। किंबहुना उरले। शुचित्वचि।।४७४।।
म्हणोनि सदभाव जीवगत।बाहेरी दिसती फाकत। ते स्फटिकगृहींचे डोलत।
दीप जैसे।।४७५।।
विकल्प जेणे जेणे उपजे।नाथिले विकृती निपजे। अपप्रवृत्तींचीं बीजें।अंकुर घेती।।४७६।।
ते आईके देखे अथवा भेटे।परि मनीं कांहीचि नुमटे ।
मेघरंगे न कांटे ।व्योम जैसे।।४७७।।
एर्हवी इंद्रियांचेनि मेळे ।विषयांवरी लोळे।
परि विकाराचेनि विटाळे।लिंपिजेना।।४७८।।
कां पतिपुत्रांचे आलिंगी।एकचि ते तरुणांगी।
तेथ पुत्रभावाचा अंगी।न लगे कामु।।४८०।।
भावार्थ:-श्लोक ४७१ते४८०:-

मनात वाईट कर्मांचा विचार असेल तर सत्कर्म हातून घडणार नाही. खोट्या कर्माचे फळ खोटेच असते. लिंबोणी पेरली तर लिंबोणींचे कडू झाडच येणार हेच सत्य आहे. दारुची बाटली गंगेच्या पाण्यात बुडवली तर दारुचे रूपांतर पवित्र गंगाजळात होणार नाही. म्हणून सत्‌कर्म करावे हा निस्चय मनात झाला तरच हातून चांगले कर्म घडेल. म्हणून बाह्य सत्कर्मांनी शरीर पवित्र होते तर प्रेरक पवित्र विचारांनी मनातील मलीनता संपते.

मनात सत्कर्म प्रेरणा आणि तदनुसार कर्म घडणे.तर निर्मलत्व प्राप्त होते.जसे गंगा आणि यमुना नद्या एकत्र आल्यावर संगम पवित्र तीर्थक्षेत्र होते.याला शंभर टक्के शुचित्व म्हणायला हवे. अंतरंगात सद्‌भाव भरुन राहिले तर सदवर्तन घडते. जसे स्फटिकांच्या भिंतींचे घर बांधले तर घरातील दिव्यांनी भिंती उजळुन जातात. याउलट विकल्प उत्पन्न झाला म्हणजे मी चांगले कर्म कां करू?असा वाईट विचार आल्यावर लगेच मन विकृत होते.वाईट कर्म करावीत अशा विचारांना घुमारे फुटतात. पण मन परमेश्वरी भक्तीने भरले असेल तर वाईट कर्मांचा विचार स्वप्नातसुध्दा येत नाही.जसे ढगांचे विविध आकार रंग यांना आकाशाला काहीच होत नाही. इंिद्रये वाईट, मलिन झाली तरी विषय वासना मनात येत नाहीत.विकारां पासून संतवृतीचा माणुस वेगळा असतो. चांगल्या घरातील गृहिणी रस्त्यावर फिरताना त्याच रस्त्यावर वाईट चालीची स्त्री चालली असेल, तर सद्‌प्रवृत्त स्त्री तिचा पतिव्रता धर्म सोडत नाही. एकच विवाहिता पुत्र आणि पतीला आलिंगन देते. पुत्र मातृप्रेम असते, तर पतिप्रेमात पत्नीचे प्रेम असते.
।।मन चंगा तो कटवटी में गंगा।।

प्रकाश पागनीस

Nilam: