एक तरी ओवी अनुभवावी

प्रकाश पागनीस

।।जय श्री राम ।।
।।ज्ञानेश्वर माऊलींचे दर्शन ।।
।। अ. १३ वा.
माऊलींची विनम्रता ।।

माऊली मराठी अभ्यासकांचे अनभिषिक्त सम्राट आहेत.ज्ञानेश्वरी ग्रंथात त्यांच्या ओवींत जर अनेक ठिकाणी क्षमा मागतात. विनम्रता प्रकट करतात, एक प्रत्यक्ष देव असणारे विनम्रता प्रकट करतात, तर प्रवचनकार, कीर्तनकार, गुरू म्हणवून घेणारे आपली नम्रता कशी विसरतात, याचे वाईट वाटते.
ऐसे म्हणितले देवे । ते बोले ऐके सांगावे ।
परि फाकला हे उपहासावे । तुम्ही मज ।।३१३।।
खरे म्हणजे श्रीकृष्णांनी भगवद््गीतेत अहिंसेविषयी थोडक्यात सांगितले, पण मला विस्ताराने बोलावेसे वाटले. तुमच्या मनात या विस्ताराचा रागसुद्धा आला असेल.
म्हणाल हिरवे चारी गुरू ।
विस्तारे मागील मोहर धरू ।
कां वारे लागी पांखिरू । गगनी भरे ।।३१४।।
तुम्ही म्हणाल, हिरवे गवत पाहिल्यावर वासरू दावे तोडून पळते, घर विसरते. छान वारा सुटल्यावर छोट्या पाखराला आकाशात भरारी घ्यावीशी वाटते. तसे काहीसे माझे झाले, असे माऊली म्हणतात.
तैसिया प्रेमाचिया स्फूर्ती । फावलिया रसवृत्ती ।
वाहविला मती । आकळेना ।।३१५।।
माझे श्रोत्यांवरील प्रेम निमित्त झाले आणि बोलणे वाढले. माझ्या वाणीला रसदारपण आले, असे वाटते.
तरि नोहे अवधारा । कारण आहे विस्तारा ।
एऱ्हवी पद तरी अक्षरा । तिहींचेंचि ।।३१६।।
पण आपण लक्ष देऊन ऐकत आहात, हे पाहून विस्तार बोलण्याचा झाला हे खरे आहे, खरे म्हणजे अ-हिं-सा हे तीन अक्षरी शब्दच नव्हे काय?
अहिंसा म्हणता थोडी ।
परि तेचि होय जी उघडी ।
जै लोटिजती कोडी । मतांचिया ।।३१७।।
खऱ्या अहिंसेवर थोडक्यात बोलता आले असते. पण माझ्या अहिंसेबाबत कोट्यवधी मतमतांतरे दिसून आली.
एऱ्हवी प्राप्ते मतांतरे । थांबूनि अंगभरे ।
बोलिजैल ते न सरे ।तुम्हापाशी ।३१८।।
या मतमतांतरांसंबंधी मला किती बोलू असे झाले, कारण तुमच्यासारखे उत्तम श्रोते मला मिळाले आहेत.
रत्नपारखियांचां गावी ।
जाईल गंडकी तरि सोडावी ।
काश्मिरी न करावी । मिडगणे जेवी ।।३१९।।
माझ्याकडून अज्ञानाने चूक होते आहे. आपण रत्नपारखी आहात आणि आपणास मी नजर करण्यासाठी नर्मदेतील गोटे आणले आहेत. जसे साक्षात्् सरस्वतीची स्तुती करण्यासाठी शब्द सापडत नाहीत.
काइसा वासु कापुरा । मंद जेथे अवधारा ।
तेथ पिठाचा विकरा । तिये साते ।।३२०।।
कापूर पांढरा शुभ्र असतो. सुगंधी असतो.म्हणून कापूर म्हणून गव्हाचे पीठ विकण्यास गेले तर काय होईल, तसे काहीसे माझे होते आहे.
म्हणोनि इये सभे । बोलकेपणाचे क्षोभे ।
लाग सर न लभे । बोला प्रभू ।।३२१।।
तुमच्यासारख्या ज्ञानी लोकांचे सभेत माझ्या बोलण्याचा टिकाव तरी लागेल काय?
इथे माऊलींनी विनंतीवजा बोलणे अावरते घेतले. कारण ज्ञानी किंवा ज्ञाता यांना वयाचे बंधन नसते.
कंठोपनिषदातील ज्ञाता नचिकेत वयाने बोलके आहे, तर सद््गुरु प्रत्यक्ष यमधर्म आहे. पण यमराजांनी नचिकेतचे वयाकडे पाहिले नाही. चौदाशे वर्षांचा चांगदेव छोट्या मुक्ताबाईंना गुरू मानतो. कारण चांगदेव आत्मज्ञान प्राप्त नव्हते.
।। ज्ञानराज माझी योग्यांची माऊली ।
जेणे निगमवल्ली प्रकट केली ।।

Sumitra nalawade: