एक तरी ओवी अनुभवावी

-प्रकाश पागनीस

।।जय श्री राम ।।
।।ज्ञानेश्वर माऊलींचे दर्शन ।।
।।अहिंसकाचे चालणे पाहा ।।

यामध्ये आपण अहिंसकाचे चालणे कसे असते आपण पाहिले. हा काल पाहिलेला विषय आजही पाहणार आहोत. आजच्या ओव्या २५३ ते २६० आहेत.
माऊलींनी अहिंसकाच्या चालण्यानंतर बोलणे आणि पाहणे हे दोन विषय घेतले आहेत. जे आपण नंतर पाहणार आहोत. तूर्तास आपण ओवी २५३ पासून आजच्या निरुपणास आरंभ करू या.
नाना कमळदळे ।
डोलाविजती ढाळे ।
तो जेणे पाडे बुबुळे ।
वारा घेपे ।।२५२।।
आपल्या डोळ्याना थंडावा मिळावा, म्हणून कोणी कमळांचे पाकळीने वारा घेतला तर तो वारा किती सुखद वाटले.इतकी हळुवार चाल अहिंसकाची असते.
तैसेनि मार्दवे पाय ।
भूमिवरी न्यसीतु जाय ।
लागती तेथ होय ।
जना सुख ।।२५४।।
कमळ दलातील वारा वाहावा,
तशी तो पावले टाकून चालतो.
ऐसिया लघिमा चालता ।
कृमिकीटक पांडुसुता ।
देखे तरि माघौता । हळुचि निघे ।।२५५।।
अशी रीतीने हळुवारपणे चालताना त्याला किडा-मुंग्या दिसल्या तर त्या पायाखाली चिरडतील, म्हणून तो माघारी वळतो.
म्हणे पायो धडफडील ।
तरी स्वामिची निद्रा मोडेल ।
रचलेपण पडैल ।झोती हन ।।२५६।।
आपण धाडधाड पावले टाकली तर ध्यानाला बसलेल्या गुरूची समाधी भंग पावेल म्हणून तो आश्रमावरुन जातात. मंद मंद पावले टाकतो
इया काकुळती । वाहणी घे माघौती ।
कोणेही व्यक्ती । न वचे वरी ।।२५७।।
एखाद्या गरीब माणसाला आपले आगमनाचे दडपण येत असेल तर तो त्या रस्त्याचेवरुन माघारी फिरतो. आपल्या ज्ञानाचीसुद्धा कोणी भीती बाळगू नये, असे त्याला वाटते.
जीवाचेनि नावे । त्रुणातेही नोलांडावे ।
मग लिखिता जावे । हे के गोठी ।।२५८।।
गवतातसुद्धा जीव आहे. हे समजून गवतावरूनसुद्धा तो चालत नाही. तर त्याचे चालण्याने कोणी दुखावला, अशी गोष्ट लिहिली जाईल काय?
मुंगिये मेरू नोलांडावे ।
मशका सिंधू न तरवे ।
तैसा भेटलिया न करवे ।
अतिक्रमु ।।२५९ ।।
त्याने आपण स्वतःवर बंधने घालून घेतलेली असतात. मुंगी कधी मेरूपर्वत ओलांडत नाही. चिलटाने समुद्राला उडत उडत ओलांडले नाही. कारण निसर्गतः मुंगी आणि चिलट यांना कमी शक्तीचे बंधन आहे.तसे अहिंसात्मक माणुस सद्‌भावाची बंधने स्वीकारतो.
ऐसी जयाची चाली । कृपा फळा आली ।
देखसी जियाली । दया वाचा ।।२६०।।
अहिंसेचा स्वीकार करणारा कसा चालतो. त्याचे कृपाळू वर्तन कसे असते आपण पाहिले. आता अशा दयाळू माणसाचे बोलणे कसे असते ते आपण पाहूया.
।। बोले तैसा चाले ।
त्याची वंदावी पाऊले।।

Sumitra nalawade: