एक तरी ओवी अनुभवावी

।।जय श्री राम ।।
।।ज्ञानेश्वर माऊलींचे दर्शन ।।
।।अ.१३वा.”माऊलींचा आत्मविश्वास “।।

माऊलींकडे विनम्रता होतीच, पण याचबरोबर दृढ आत्मविश्वास होता. जे दोन्ही गुण आपल्याला घेण्यासारखे आहेत. मी गीता सांगतो आहे, जी तुमचा आवडता ग्रंथ आहे एवढे बोलल्यावर श्रोत्यांच्या मनाचा ते वेध घेतात.
शंकेचेनि गदळे । जै शुद्ध प्रमेय मैँळे ।
तै मागुते पाऊलीं पळे।
अवधान येते ।।३२२।।
मी काय बोलेन ही आपल्या मनात शंका आलीच तर आपले ऐकण्याचे भान निघून जाईल आणि मी श्रीकृष्णांचे सिद्धांत कथन करतो आहे ते नीटपणे तुम्हाला समजणार नाहीत.

कां करोनि बाबुळियेची। जळे जिये ठाती।
तयांची वास पाहती ।हंस काई ।।३२४।।
कां अभ्रापलीकडे ।येत चांदणी कोडी ।
तै चकोरे चांचुवडे ।उचलितीना ।।३२५।।
दोन दृष्टांतात माऊलींनी ज्ञान अज्ञानाने झाकले जाऊ शकते, म्हणून अज्ञान वक्ता दूर करणार आहे हे विसरू नये. जसे स्वच्छ पाणी पिणारा हंस पानगळीने झाकलेले पाणी पित नाही. चकोर पौर्णिमेचा चंद्र आणि चांदणे ढगाआड असेल तर आपली रसिकतेची चोच उघडत नाही.
तैसे तुम्ही वास न पाहाल ।
ग्रंथु नेघा वरि कोपाल ।
जरी निर्विवाद नव्हेल । निरुपण ।।३२६।।
न बुझवितां मते ।न फिटे आक्षेपांचे लागते ।
ते व्याख्यान जी तुमते । जोडुनि नेदी।।३२७।।
आणि माझे तवं आघवे । ग्रंथन येणेचि भावे । सन्मुख सदा ।।३२८।।
अहिंसे संबंधी अनेक मतमतांतरे समजावून देताना नेमके सांगण्यास वेळ लागला यासाठी तुम्ही रागवा, पण लक्षात घ्या, माझे निरूपण गीतेवरचे आहे. ते परिपूर्ण व्हावे पण व्याख्यान आपण संत, श्रोते आहात हे लक्षात ठेवून मी करत़ो आहे. माझ्या निरूपणाने आपण खूश व्हावे इतकीच माझी अपेक्षा आहे.

एरवी तरी सांचोकारे ।
तुम्ही गीतार्थाचे सोइरे ।
जाणोनि गीता जीवसरे ।
धरली मियां ।।३२९।।
जे आपुले सर्वस्व द्याल ।
मग इयेते सोडवुनि न्याल ।
म्हणोनि ग्रंथु नव्हे.वोल ।
साचचि हे ।।३३०।।
आपण सर्व श्रोते गीतेचे भक्त आहात.म्हणून तर आपली लाडकी गीता मी निरूपणास घेतली आहे. आता आपले अवधानाचे सर्वस्व माझ्याकडे सोपवा, मग आपली लाडकी गीता जी माझ्याकडे आपली ठेव म्हणून माझ्याकडे सोपवली आहे ती माझ्या ग्रंथांचे श्रवण केल्याने आपणास प्राप्त होणार आहे.
आपली कृपा मला मिळावी म्हणून बोलतो आहे. माऊलींनी नवव्या अध्यायाचे आरंभात जी ओवी लििहली आहे. तीच या निरूपणाचे अखेरीस देऊन आपला आजचे साठी निरोप घेतो. माऊली एक प्रतिज्ञोत्तर करतात. हे श्रोते हो माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. तुम्हाला कैवल्य सुख मिळणार आहे.
।।तरि अवधान एकवेळ दीजे ।
मग सर्वसुखासि पात्र होइजे ।
हे प्रतिज्ञोतर माझे । उघड ऐका ।।९-१।।

प्रकाश पागनीस

Nilam: