Atiq Ahmad News : गुन्हेगारी आणि राजकारण अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये दबदबा असलेल्या तसेच आमदारकी, खासदारकी भूषवलेल्या उत्तर प्रदेशमधील अतिक अहमद या नावाची सध्या देशभरात चर्चा होत आहे. अतिक अहमद सध्या तुरुंगात असून त्यांना नुकतेच अहमदाबादमधील साबरमती तुरुंगातून प्रयागराज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उमेश पाल अपहरण प्रकरणात प्रयागराजच्या खासदार आमदार कोर्टाचा निर्णय आला आहे. 17 वर्षे जुन्या या प्रकरणात अतीक अहमदसह तिघांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. तर अतिक अहमदचा भाऊ अशरफसह 7 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. न्यायालयाने दोषी ठरविलेल्या तिघांमध्ये अतिक अहमद, त्यांचे वकील खाम सुलत हनिफ आणि दिनेश पासी यांचा समावेश आहे, जे त्यावेळी नगरसेवक होते. न्यायालयाच्या निर्णयानंतर भारतीय जनता पक्षाच्या सर्वच नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. योगी राजमध्ये दोषींना मुक्त सोडले जाणार नाही, असे भाजपचे म्हणणे आहे.
अतिक अहमदला दोषी ठरविल्यानंतर भाजपचे राज्यसभा खासदार हरनाथ सिंह यादव म्हणाले की, उत्तर प्रदेशात कायद्याचे राज्य आहे, दोषी कोणीही असले तरी त्यांना सोडले जाणार नाही. दुसरीकडे, बस्तीचे भाजप खासदार हरीश द्विवेदी म्हणाले की, या निर्णयानंतर न्यायाची आशा वाढली आहे आणि योगी जी उत्तर प्रदेशमध्ये कायद्याचे राज्य स्थापित करण्यात व्यस्त आहेत. अतीक अहमदच्या शिक्षेवर भाजपचे प्रवक्ते राकेश त्रिपाठी म्हणाले की, “योगी सरकारमधील अतीकची भीती नष्ट झाली आहे. फिर्यादी पक्षाने न्यायालयात आपली बाजू जोरदारपणे मांडली, योगींच्या प्रबळ इच्छाशक्तीमुळे हे शक्य झाले आहे. ते पुढे म्हणतात की, एके काळी जेव्हा डझनभर न्यायाधीश अतिकच्या खटल्याच्या सुनावणीतून माघार घेत होते, तेव्हा आज न्याय मिळाला आहे. आम्ही माफिया नष्ट करण्याचा आमचा संकल्प पूर्ण करू.”