मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार! मुख्यमंत्र्यांसह ३ मंत्री, ६ आमदारांच्या घरांवर हल्ला

मणिपूर हिंसाचार

मणिपूरमध्ये (Manipur Violence) पुन्हा हिंसाचार सुरू झाल्याने येथील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. सर्व सहा बेपत्ता व्यक्तींचे मृतदेह सापडल्यानंतर मणिपूरमध्ये तणाव वाढला. आंदोलकांनी ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला केला. त्यांच्या निवासस्थानांची तोडफोड केली असून काहींना आगी लावल्या. संतप्त जमावाने मुख्यमंत्री एन बिरेन सिंह (Chief Minister N Biren Singh) यांच्या घरावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यामुळे इंफाळच्या विविध भागात जमावाला पांगवण्यासाठी सुरक्षा दलांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मंत्री, आमदारांची घरे पेटवून दिली

आंदोलकांनी मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांच्या जावयांच्या निवासस्थानासह तीन मंत्री आणि सहा आमदारांच्या घरांची तोडफोड केली. त्यांच्या मालमत्तांना आग लावली. विशेषत: जिरीबाममध्ये हिंसाचार उफाळला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने अनिश्चित काळासाठी कर्फ्यू लागू केला आहे. राज्यातील ७ जिल्ह्यांतील इंटरनेट सेवा निलंबित केली आहे.

‘या’ जिल्ह्यांत कर्फ्यू लागू

इम्फाळ पूर्व आणि पश्चिम, विष्णुपूर, थौबल आणि काकचिंग जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. सात जिल्ह्यांतील इंटरनेट आणि मोबाइल डेटा सेवा दोन दिवसांसाठी बंद ठेवली आहे. आर्मी, आसाम रायफल्स आणि राज्य पोलिसांच्या तुकड्या तैनात केल्या असून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

मंत्री, आमदारांच्या घरांवर जमावाचा हल्ला

जिरीबाम शहरातील दोन चर्च आणि तीन घरे जमावाने पेटवून दिली आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. आंदोलकांनी आरोग्य मंत्री सपम रंजन, ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्री एल सुसेंद्रो सिंह आणि महापालिका प्रशासन आणि गृहनिर्माण विकास मंत्री वाय खेमचंद यांच्या घरांवर हल्ला केला. मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांचे जावई भाजप आमदार आरके इमो यांच्या घरावरही हल्ला झाला.

२३ जणांना अटक, पिस्तूल, दारूगोळा जप्त

इंफाळ आणि विष्णुपूरमधील आमदार आणि मंत्र्यांच्या घरांच्या तोडफोड प्रकरणी २३ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी संशयितांकडून एक पिस्तूल, सिंगल बॅरल ब्रीच लोडर (एसएसबीएल) दारूगोळ्याच्या सात राउंड आणि आठ मोबाईल फोनही जप्त केल्याची माहिती आज रविवारी अधिकाऱ्यांनी दिली.

६ मृतदहे सापडले

विस्थापितांच्या छावणीतून सोमवारपासून बेपत्ता झालेल्या दोन महिला आणि एका मुलाचा मृतदेह शनिवारी जिरीबाममधील बराक नदीत आढळून आला. तर शुक्रवारी रात्री एक महिला आणि दोन मुलांसह ३ मृतदेह सापडले होते. ११ नोव्हेंबर रोजी पोलिस स्थानकावर झालेल्या हल्ल्यादरम्यान कुकी दहशतवाद्यांनी त्यांचे अपहरण केले होते. त्यांचे मृतदेह सापडल्यानंतर मणिपूरमध्ये हिंसाचार उफाळला आहे.

Rashtra Sanchar: