औरंगाबाद | Aurangabad Abortion Case – मराठवाड्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मराठवाड्यात (Marathwada) गेल्या 20 दिवसांमध्ये तीन अवैध गर्भपाताच्या (Illegal Abortion) घटना समोर आल्या आहेत. तसंच या तीन घटनांमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
हा धक्कादायक प्रकार औरंगाबाद (Aurangabad) शहरातील जटवाडा येथे घडला आहे. जटवाडा येथील होनाजीनगरात एका फ्लॅटमध्येच अवैध गर्भपात केंद्र चालविले जात असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे. आधी दोन मुली असल्यामुळे केवळ मुलाच्या हव्यासापोटी तिसऱ्यांदा गर्भवती राहिलेल्या महिलेचा गर्भपात करण्यात आला त्यानंतर अतिरक्तस्त्राव झाल्यानं तिचा मृत्यू झाला असल्याचं समोर आलं आहे.
12 ऑक्टोबर 2022 रोजी ही घटना घडली असून या घटनेप्रकरणी अवैध गर्भपात करणाऱ्या डॉक्टर आणि नर्सविरुद्ध 22 फेब्रुवारीला बेगमपुरा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉक्टर शाम जैस्वाल आणि नर्स सविता सोमनाथ थोरात अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर तारा सुनील शेळके (रा. धोपटेश्वर, ता. औरंगाबाद) असं मृत महिलेचं नाव आहे.
दरम्यान, गेल्या वीस दिवसांमध्ये ही मराठवाड्यातील तिसरी घटना आहे. याआधी 5 फेब्रुवारी रोजी औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील चित्तेगाव येथे एका डॉक्टर दाम्पत्यानं महिलेचा गर्भपात केल्याची घटना समोर आली होती. याप्रकरणी डॉक्टर दाम्पत्य डॉ. अमोल जाधव आणि डॉ. सोनाली उद्धव काळकुंबे-जाधव यांच्यावर बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसंच हे दोन्ही आरोपी अजूनही फरार आहेत. त्यानंतर जालन्यातील बदनापूर तालुक्यातील सोमठाणा येथील एका विवाहितेचा अवैध गर्भपात करण्यात आला होता. या महिलेचा अवैध गर्भपात केल्यानंतर तिला रक्तस्राव सुरु झाल्यानं एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला होता.