मुंबई | राज्य शासनाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेसाठी नोंदणी करण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असून, राज्यातील नोंदणीकृत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी तातडीने नावनोंदणी करून यामध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने करण्यात आले. नावनोंदणी करण्याचा अंतिम दि. १५ सप्टेंबर आहे.
राज्यात १९ सप्टेंबर २०२३ पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून पुरस्कार देण्यात येणार आहेत. राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकांना अनुक्रमे पाच, अडीच, एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहेत.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या ई-मेल आयडीवर अथवा संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयात १५ सप्टेंबर २०२३ पर्यंत नोंदणी करावी. स्पर्धेची अधिक माहिती आणि अर्ज htttp://pldeshpandekalaacademy.org या संकेतस्थळावरही उपलब्ध करून देण्यात आले असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य विभागाने दिली.