चक्क ! एका दिवसात विक्रमी सातबारे डाऊनलोड

पुणे : राज्यात २००३ पासून संगणकीकृत सातबारा मोहीम राबविली जात आहे. या राष्ट्रीय भूमी अभिलेखांचे आधुनिकीकरण कार्यक्रम अंतर्गत सर्व जिल्ह्यांतील ग्रामीण अधिकार अभिलेखांचे संगणकीकरण २००२-०३ पासून सुरू झाले. २०१०-११ पर्यंत ते जिल्हास्तरावरच संगणकीकृत केले जात होते. ऑनलाइन सातबारा, महसूल विभागाने ग्रामीण भागातील भूमिअभिलेखांचे आधुनिकीकरण कार्यक्रमअंतर्गत सुरू असलेल्या ई-फेरफार प्रकल्पाद्वारे संगणकीकरण पूर्ण करून २०१५-१६ पासून हे सर्व संगणकीकृत अधिकार अभिलेख ऑनलाइन केले.

राज्यातील ३५ जिल्ह्यांतील ३५८ तालुक्यांतील सुमारे २ कोटी ५३ लाख गाव नमुना नं. ७/१२ ऑनलाइन करून त्यातील त्रुटी दूर करण्यासाठी राज्यातील सर्व तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार यांचे सर्व उपजिल्हाधिकारी यांनी अहोरात्र कामकाज करून हे अशक्य वाटणारे काम पूर्णत्वाकडे नेले. वर्षभरात राज्यात तब्बल २१ लाख ७७ हजार सातबारे व एक कोटी १० लाख खाते उतारे डाउनलोड झाले आहेत. याशिवाय महसूल विभागाने इतरही अनेक ऑनलाइन सुविधा लोकांना उपलब्ध करून दिल्या आहेत.

राज्यातील सर्वसामान्य लोकांना, शेतकर्‍यांना आपल्या दैनंदिन कामासाठी लागणारा सातबारा, आठ ‘अ’चा उतारा सहज व विनाहेलपाट्याशिवाय मिळण्यासाठी शासनाने डिजिटल सातबारा प्रकल्प सुरू केला.या सुविधेचा वापर करून १८ एप्रिलला एका दिवसात ८७ हजार नागरिकांनी एक लाख दोन हजार उतारे आणि मिळकतपत्रिका ऑनलाइन डाऊनलोड केल्या.
ई-फेरफार प्रकल्पांतर्गत आतापर्यंत फक्त डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा आणि आठ-अ उतारे नागरिकांना डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होते. मिळकतपत्रिकादेखील आता मिळू लागली आहे.

सरकारी योजनांचा लाभ, पीककर्ज, जमिनीची खरेदी विक्री यासाठी सातबारा उतार्‍यांबरोबर खाते उतारे हे आवश्यक असतात. हे खाते उतारे डिजिटल स्वाक्षरीयुक्त मिळू लागले आहेत. त्यानुसार एका दिवसात एक लाख दोन हजार डिजिटल स्वाक्षरीत सातबारा आणि खाते उतारे; तसेच मिळकतपत्रिका ऑनलाइन डाऊनलोड करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये ७६ हजार ६९ साताबारा उतारे आहेत. आठ-अ उतारे १८ हजार ५२६ आणि मिळकतपत्रिका ५६१७ आहेत. एकाच दिवसांत एवढ्या मोठ्या प्रमाणात विविध उतारे डाउनलोड केल्याने शासनाला २० लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला असल्याची माहिती जमाबंदी आयुक्तालयाकडून देण्यात आली.

जमाबंदी आयुक्तालयाने https: //aapleabhilekh.mahabhumi.gov.in/dslअ‍ॅ या संकेतस्थळावरून ऑनलाइन पैसे भरून डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा, आठ-अ उतारे आणि मिळकतपत्रिका डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सरकारी कामकाजासाठी हे उतारे ग्राह्य धरले जातात.

https: //bhulekh.mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर विनाशुल्क डिजिटल स्वाक्षरी नसलेले; पण माहितीसाठीचे उतारे उपलब्ध आहेत. या सुविधेचा वापर करून १८ एप्रिलला एका दिवसात ८७ हजार नागरिकांनी एक लाख दोन हजार उतारे आणि मिळकतपत्रिका ऑनलाइन डाऊनलोड केल्या. राज्यातील आतापर्यंतचा हा उच्चांक आहे.

Prakash Harale: