Raundal (man baharal marathi song) : ख्वाडा (Khwada) या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारून आणि बबनमधून (Baban) लोकांच्या मनावर अधिराज्य केलेला भाऊसाहेब शिंदे मागील काही दिवसांपासून आपल्या आगामी चित्रपटाच्या कामत व्यग्र आहे. त्याचा आगामी रौंदळ चित्रपटाने त्याच्या पोस्टर रिलीज झाल्यापासूनच प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता वाढवली आहे. पोस्टर मधला भाऊसाहेबचा लाल मातीतला रांगडा लूक लोकांच्या मनात घर करून बसला आहे. मात्र, काहीच दिवसांपूर्वी आलेल्या या चित्रपटाच्या टीझरने तर रसिकांच्या मनात मोठं कुतूहल आणि उत्सुकता अजूनच वाढवली आहे. दरम्यान, या रसिकांच्या उत्सुकतेला थोडा दिलासा मिळाला आहे. कारण या चित्रपटातलं पाहिलं गाणं आता रिलीज झालं आहे.
‘रौंदळ’ या चित्रपटातील ‘मन बहरलं’ हे लक्ष वेधून घेणारं नवं कोरं गाणं सोशल मीडियाद्वारे रिलीज करण्यात आलं आहे. या चित्रपटात भाऊसाहेब शिंदे मुख्य भूमिकेत दिसत आहे. भूमिका फिल्म्स अॅण्ड एंटरटेनमेंटच्या निर्मिती संस्थे अंतर्गत बाळासाहेब शिंदे, डॉ. पुरुषोत्तम भापकर, प्रमोद चौधरी आणि भाऊ शिंदे यांनी ‘रौंदळ’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. गजानन नाना पडोळ यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात भाऊसाहेबची जोडी नेहा सोनावणे या नवीन अभिनेत्रीसोबत आहे. ‘रौंदळ’मधील ‘मन बहरलं’ या गाण्यातून नेहाची रुपेरी पडद्यावर एन्ट्री झाली आहे.
भाऊसाहेब आणि नेहा यांच्यावर चित्रीत करण्यात आलेलं हे रोमँटिक साँग गीतकार डॅा. विनायक पवार यांनी लिहिलं आहे. गायिका वैशाली माडेच्या सुमधूर आवाजात संगीतकार हर्षित अभिराज यांनी संगीतबद्ध केलं आहे. रौंदळ २०२३ मध्ये चित्रपटगृहांत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी आणि हिंदी दोन्ही भाषांत एकदाच चित्रपट रिलीज होणार असल्याची माहिती आहे.